गॅसचा भडका ! LPG गॅस सिलेंडर पुन्हा महागला ! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या एलपीजी (LPG) सिलेंडरच्या किमतीत २९ रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ ७ जूनपासून देशभरात लागू झाली आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ असून, यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.
महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला आहे. घरगुती एलपीजी (LPG) गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली असून आता स्वयंपाकघराचा खर्च वाढणार आहे. सरकारी तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत २९ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. नव्या दरांची अंमलबजावणी तत्काळ करण्यात आली आहे. मुंबई आणि पुण्यात सिलेंडरचा दर ९४१.५० रुपये झाला असून चेन्नईमध्ये तो ९५७.५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती वाढत असताना आता घरगुती गॅसही महागल्याने सर्वसामान्य कुटुंबांच्या मासिक बजेटवर अतिरिक्त ताण येणार आहे. विशेषतः मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी ही वाढ चिंतेची बाब मानली जात आहे.
जागतिक पातळीवर ऊर्जा आणि इंधन बाजारात सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे (आणि मध्य पूर्वेतील तणाव) तेल कंपन्यांवर आलेला ताण कमी करण्यासाठी ही दरवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात आले.


