सावदा येथे आ. गं. हायस्कूल व एन. जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात ३० बाय ३० फुटांची भव्य रांगोळी; संकल्प दिवस उत्साहात साजरा
सावदा, ता. रावेर | मंडे टु मंडे न्यूज | श्री आनंदीबाई गंभीरराव हायस्कूल व श्री नामदेवराव गोमाजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय, सावदा येथे विद्यार्थिनींनी तब्बल ३० फूट बाय ३० फूट आकाराची भव्य रांगोळी साकारत संकल्प दिवस उत्साहात साजरा केला.
विद्यालयातील विद्यार्थिनींनी राष्ट्रीय मानचिन्ह, तिरंगा आणि राजमुद्रा या प्रतीकांचा रांगोळीत कलात्मक वापर करून आकर्षक कलाकृती साकारली. या रांगोळीसाठी झेंडूची फुले, शेवंतीची फुले, कडुनिंबाची पाने यांसह विविध नैसर्गिक साहित्याचा वापर करण्यात आला. त्यासोबत रांगोळी व गुलालाच्या माध्यमातून रांगोळीला आकर्षक स्वरूप देण्यात आले.
सकाळी ११ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत विद्यार्थिनींनी मेहनत घेत ही भव्य रांगोळी पूर्ण केली. विद्यार्थिनींच्या कलागुणांचे कौतुक करण्यासाठी सावदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. रेणुका राजेंद्र पाटील, शिक्षण सभापती सचिन बऱ्हाटे, नगरसेविका सौ. प्रतीक्षा भंगाळे, सौ. सुनीता तायडे तसेच प्रमोद चौधरी खक्के, सागर चौधरी, मनीष भंगाळे, संजय तायडे यांच्यासह सावदा शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थिनींच्या कलाकृतीचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन म्हणून पेन भेट देत अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थिनींच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले.
या उपक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री. संजय मोतीराम महाजन, कलाशिक्षक श्री. नंदकिशोर घनश्याम पाटील, श्री. अरुण छगन राठोड तसेच श्रीमती भारती सतीश भंगाळे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी ही भव्य रांगोळी साकारली.


