उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संत मुक्ताई पालखीसाठी भव्य रथ समर्पित; आ. चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके | श्रीक्षेत्र मुक्ताईनगरच्या आध्यात्मिक आणि वारकरी परंपरेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी अशी महत्त्वपूर्ण घटना घडली असून, संत मुक्ताई संस्थानच्या मागणीनुसार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ संभाजी शिंदे यांनी आपल्या मातोश्री स्वर्गीय सौ. गंगुबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ श्रीसंत मुक्ताबाई पालखी सोहळ्यासाठी भव्य आणि आकर्षक रथ समर्पित केला आहे. संत मुक्ताई मंदिर परिसरात हा रथ दाखल झाल्याने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील वर्षी संत मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळ्याच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्ताईनगर येथे आले असता संत मुक्ताई संस्थानच्या वतीने विविध विकासात्मक मागण्या त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या होत्या. यामध्ये संत मुक्ताई पालखीसाठी स्वतंत्र आणि भव्य रथ उपलब्ध करून देण्याची मागणी प्रमुख होती. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यांच्या प्रयत्नांना आणि संस्थेच्या आग्रहाला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ही मागणी पूर्ण केली आहे.
संत मुक्ताई पालखी परंपरेचे वैभव अधिक वृद्धिंगत करणारा हा रथ पूर्णतः तयार होऊन मुक्ताईनगर येथील नवीन संत मुक्ताई मंदिरात दाखल झाला आहे. या रथाची पाहणी आमदार चंद्रकांत पाटील, संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अॅड. रविंद्र भैय्या पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे तसेच वारकरी, टाळकरी, कीर्तनकार आणि संस्थेचे पदाधिकारी यांनी केली. यावेळी उपस्थितांनी रथाच्या भव्यतेचे कौतुक करत हा वारकरी परंपरेच्या गौरवाचा क्षण असल्याची भावना व्यक्त केली. दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या संत मुक्ताई पालखी सोहळ्याला अधिक दिमाख आणि वैभव प्राप्त करून देणारा हा रथ भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. संत मुक्ताईंच्या पालखीला आता अधिक आकर्षक आणि सुशोभित स्वरूप लाभणार असून, मुक्ताईनगरच्या धार्मिक पर्यटनालाही याचा सकारात्मक लाभ होणार आहे.
या भव्य रथाचा अनावरण सोहळा बुधवार, २४ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुक्ताईनगर येथे पार पडणार आहे. अनावरणानंतर संत मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, मागील तीन ते चार वर्षांपासून उपमुख्यमंत्री शिंदे हे वारकरी वेश परिधान करून, डोक्यावर फेटा बांधून आणि खांद्यावर टॉवेल घेत वारकरी रूपात या सोहळ्यात सहभागी होत आहेत. संत मुक्ताईंचे दर्शन घेऊन पालखी प्रस्थान सोहळ्यास उपस्थित राहण्याची त्यांची परंपरा यावर्षीही कायम राहणार आहे.
या सोहळ्यास राज्यातील अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याने मुक्ताईनगर पुन्हा एकदा भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघणार आहे. विशेषतः आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे संत मुक्ताई संस्थानच्या अनेक प्रश्नांना गती मिळत असल्याची भावना वारकरी व नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जतन करण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
राज्यभरातील वारकरी, भाविक आणि संतप्रेमींनी मोठ्या संख्येने मुक्ताईनगर येथे उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार व्हावे, असे आवाहन संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अॅड. रविंद्र भैय्या पाटील तसेच संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे यांनी केले आहे. याप्रसंगी संत मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष, एडवोकेट रवींद्र भैया पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, सम्राट पाटील विनायक हरणे, ह भ प उद्धव महाराज जुनारे, हितेश पाटील, पियुष मोरे, पांडुरंग पाटील, ज्ञानेश्वर हरणे, गणेश पाटील,


