भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

वर्सोवा परिसरात इमारतीवरून पडून जळगावच्या तरुणाचा मृत्यू; कारण अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरू

मुंबई,मंडे टु मंडे न्युज | दि. १९ : जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथील २८ वर्षीय तरुणाचा मुंबईतील वर्सोवा परिसरात बहुमजली इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन सुनील पाटील (वय २८, रा. नशिराबाद, जि. जळगाव) हा हॉटेल व्यवसायासह सरकारी कंत्राटांची कामे करीत होता. काही दिवसांपूर्वी तो मित्रासोबत मुंबईत फिरण्यासाठी आला होता. स्वभावाने शांत व मनमिळाऊ असलेल्या पवनवर गेल्या काही काळापासून मानसिक तणाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, त्यामागील नेमके कारण काय होते याचा शोध पोलिस व नातेवाईक घेत आहेत.

१८ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.५० वाजण्याच्या सुमारास अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा म्हाडा परिसरातील ‘आकाश दीप’ सोसायटीच्या छतावरून खाली पडल्याने पवनचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळविले. पवन त्या इमारतीत नेमका कोणत्या कारणासाठी गेला होता, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी बीएनएसएस कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, घटनास्थळावरून कोणतीही चिठ्ठी अथवा संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. त्यामुळे मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. कुटुंबीयांसह संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत आहे.

या घटनेमुळे नशिराबाद परिसरात हळहळ व्यक्त होत असून पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.पवन हा हॉटेल त्रिमूर्ती चे मालक अनिल पाटील (छोटू शेठ) व हॉटेल गौरव चे मालक योगेश पाटील (पिंटू शेठ) यांचा पुतण्या होता.
मृत्यूमागील कारणाचा उलगडा पोलिस तपासानंतरच होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!