रावेर आगाराच्या पाच नविन बसांवरून श्रेयवादाचा ‘ब्रेक फेल’; भाजपच्यां दोन्ही आमदारांच्या समर्थकांमध्ये सोशल वॉर, नागरिकांमध्ये मात्र संभ्रम
रावेर, मंडे टू मंडे न्युज चमू | रावेर बस आगाराला मिळालेल्या पाच नवीन एसटी बसांचे स्वागत होण्याऐवजी त्यावरून सोशल मीडियात श्रेयवादाची जोरदार लढाई रंगली आहे. भाजपचे आमदार अमोल जावळे आणि आमदार नंदकिशोर महाजन यांच्या समर्थकांनी स्वतंत्रपणे या बस आपल्या-आपल्या आमदारांच्या प्रयत्नांतूनच मंजूर झाल्याचा दावा करत पोस्ट व्हायरल केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सुरुवातीला आमदार अमोल जावळे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रावेर आगाराला पाच नवीन बस मिळाल्याचा दावा केला. विशेष म्हणजे याप्रकरणी आ. अमोल जावळे यांनी यासाठी ८ मार्च व ३० एप्रिल २०२६ च्या सातत्यपूर्ण केलेल्या पत्रव्यवहाराची जंत्री प्रसारीत करत आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नांनी रावेर आगाराला
५ बसेस मिळायचा दावा करण्यात आला. त्यानंतर काही वेळातच विधान परिषद आमदार नंदकिशोर महाजन यांच्या समर्थकांनीही रावेर बस आगाराला मिळालेल्या पाच नवीन एसटी बस आमदार नंदकिशोर महाजन यांच्या प्रयत्नातूनच मिळाल्याचा दावा केला. मात्र, आमदार महाजन यांचा त्याबाबतचा कुठलाच पत्रव्यवहार प्रसारित करण्यात आलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियात “खरे श्रेय कुणाचे?” हा प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
या परस्परविरोधी दाव्यांमुळे सोशल मीडियावर श्रेयवादाला उधाण आले. “बस नेमक्या कोणाच्या प्रयत्नातून मिळाल्या?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. मात्र सोशल मीडियावरील श्रेयवादाचीच अधिक चर्चा रंगल्याने विकासापेक्षा राजकीय प्रतिमेची स्पर्धा अधिक ठळकपणे समोर आल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, दोन्ही आमदार एकाच पक्षाचे असूनही त्यांच्या समर्थकांमध्ये सुरू झालेल्या या श्रेयवादाने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विकासकामांचे श्रेय घेण्याची चढाओढ सुरू असताना, प्रत्यक्षात बस मंजुरीची प्रशासकीय प्रक्रिया, शासनस्तरावरील निर्णय आणि लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा या सर्व बाबींची अधिकृत माहिती समोर येणे आवश्यक असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
राजकीय श्रेयाच्या या संघर्षात एक प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला आहे—प्रवाशांना सुविधा मिळणे महत्त्वाचे की त्या सुविधेचे श्रेय ? सोशल मीडियातील श्रेयवाद हा तालुक्यातील चर्चेचा प्रमुख विषय बनला आहे. सध्या तरी याच प्रश्नाची चर्चा रावेर तालुक्यात सर्वाधिक रंगताना दिसत आहे.


