भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचाळीसगाव

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक ; पोलिसांच्या संशयाने भांडाफोड, ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

चाळीसगाव | मंडे टु मंडे न्युज.| किराणा माल असल्याचे सांगून ओमनी वाहनातून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एकाला मेहुणबारे पोलिसांनी पकडले. दहिवद येथील बसस्थानकावर सोमवारी रात्री झालेल्या या कारवाईत ३ लाख ३२ हजार रुपयांचा विमल पानमसाला व तंबाखू, वाहतुकीसाठी वापरलेली १ लाख रुपयांची ओमनी आणि १५ हजार रुपयांचा मोबाईल, असा एकूण ४ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी चाळीसगाव  मेहुणबारे येथील हितेश अनिल अहिरराव (वय २७) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास शिरोळ, हवालदार मिलिंद कुमावत, प्रकाश कोळी तसेच पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग पाटील व दीपक महाजन हे सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी दहिवद गावातील बसस्थानकावर एमएच १८ एस ६६२ क्रमांकाची ओमनी संशयास्पदरीत्या उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांना पाहताच वाहनचालकाची घाबरगुंडी उडाली. पोलिसांनी वाहनातील मालाबाबत विचारणा केली असता त्याने किराणा माल असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना संशय आल्याने चालकासह वाहन मेहुणबारे पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तेथे वाहनाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पानमसाला व तंबाखू आढळून आला.

चौकशीत हितेश अहिरराव याने हा गुटखा धुळे येथील बिलाल नावाच्या व्यक्तीकडून घेतल्याचे पोलिसांना सांगितले. प्रतिबंधित गुटख्याची विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी गुटख्यासह ओमनी वाहन आणि मोबाईल असा एकूण ४ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!