भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

संत मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळ्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावपूर्ण निमंत्रण, यंदाही अनुभवणार वारीचा सोहळा, खास वारकरी वेशात होणार सामील

मुक्ताईनगर / मुंबई: मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके |
वारकरी संप्रदायाचे अढळ श्रद्धास्थान आणि आदिशक्तीचे मूर्त रूप असलेल्या श्री संत मुक्ताबाई यांच्या पावन भूमीतून निघणाऱ्या आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्याची वैष्णवांना ओढ लागली आहे. या पार्श्वभूमीवर, मुक्ताईनगर ठाणे येथील निवासस्थानी वारकरी संप्रदायाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे यांना या पवित्र पालखी सोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सादर करण्यात आले. आगामी २४ जून २०२६ रोजी श्री संत मुक्ताई पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून, विठ्ठल नामाचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद आणि संत मुक्ताबाईंच्या जयघोषात निघणाऱ्या या पावन सोहळ्यास उपस्थित राहण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी वारकरी संप्रदायाच्या या आदरातिथ्याचा स्वीकार करत सोहळ्याला उपस्थित राहण्याचे सहर्ष मान्य केले आहे.


विशेष म्हणजे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वारकरी संप्रदायाशी आणि संत परंपरेशी अतिशय जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. मागील वर्षीही त्यांनी या पालखी प्रस्थान सोहळ्याला विशेष उपस्थिती लावली होती. मागच्या वर्षी मुक्ताईनगर येथे येऊन त्यांनी संत मुक्ताईंच्या चरणी लीन होत वारीचा अनुपम सोहळा अनुभवला होता आणि उपस्थित लाखो भाविकांना आषाढी वारीच्या भक्तीपूर्ण शुभेच्छा दिल्या होत्या. मागील वर्षाची हीच पवित्र परंपरा कायम ठेवत यंदाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत.

यंदाच्या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतः पारंपारिक वारकरी वेशभूषा परिधान करून या प्रस्थान सोहळ्यात आणि वारीमध्ये सामील होणार आहेत. गळ्यात तुळशीची माळ, कपाळी बुक्का आणि वारकरी वेशात उपमुख्यमंत्री विठ्ठल भक्तांचा उत्साह वाढवणार असल्याने संपूर्ण वारकरी संप्रदायात आणि मुक्ताईनगर मतदारसंघात कमालीचा आनंद आणि प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.


उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी निमंत्रण देण्याच्या या पवित्र आणि मंगलमयी प्रसंगी वारकरी संप्रदायातील प्रमुख साधू-संत आणि प्रतिष्ठित मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने संत मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष श्री. रवींद्र भैय्यासाहेब पाटील, श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे प्रमुख श्री. रविंद्र महाराज हरणे, महाराष्ट्र माफदा अध्यक्ष श्री. विनोदभाऊ तराळ, श्री. कृष्णा महाराज तायडे, श्री. लक्ष्मणराव चोपदार आणि श्री. भाऊराव पाटील महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वच संतांनी व नेत्यांनी उपमुख्यमंत्र्यांना शाल, श्रीफळ आणि संत मुक्ताईंची पवित्र प्रतिमा देऊन सन्मानित केले.

श्री संत मुक्ताईंच्या पवित्र आशीर्वादाने संपन्न होणारा हा पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत भक्तिमय, शिस्तबद्ध आणि चैतन्यमय वातावरणात पार पडणार आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या या वारीतील सहभागामुळे वारकरी संप्रदायाची समृद्ध आणि अलौकिक परंपरा अधिक दृढ आणि वैभवशाली होवो, अशीच प्रार्थना याप्रसंगी उपस्थित सर्व संत आणि मुक्ताईनगरवासीयांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!