भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Uncategorized

नशिराबाद येथे ‘अप्पर तहसील कार्यालय’ मंजुरीची मागणी

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | नशिराबाद शहरात अप्पर तहसील कार्यालय मंजूर करून गतवैभव प्राप्त करून द्यावे, अशी मागणी नशिराबाद नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पंकज शामकांत महाजन यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नशिराबाद हे ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर असून ब्रिटिशकालीन काळात येथे तहसील कार्यालय, न्यायालय तसेच महसुली कामकाज चालत होते. त्या काळात नशिराबाद हे व्यापारी व महसुली केंद्र म्हणून ओळखले जात होते. स्वातंत्र्यानंतर जळगाव तालुका व जिल्ह्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाल्याने महसुली कामकाजावर ताण वाढला आहे.

महसुली प्रशासन अधिक गतिमान व सुलभ व्हावे या उद्देशाने शासनाने जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, जामनेर व जळगाव तालुक्यात अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय २ एप्रिल २०२६ रोजी जाहीर केला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

जळगाव तालुक्यातील अप्पर तहसील कार्यालय नशिराबाद येथे स्थापन झाल्यास उमाळा, देव्हारी, चिंचोली, धानवड, कुसुंबे खुर्द, कंडारी, रायपूर, मन्यारखेडा, बेळी, निमगाव, भागपूर, जळगाव खुर्द, तिघ्रे, खिर्डी, कडगाव, कानसवाडे, शेळगाव, देऊळवाडे, भोळाणे, सुजदे, भादली बुद्रुक, आसोदा, तरसोद, ममुराबाद, इदगाव, आवार, तुरखेडे, धामणगाव, खापरखेडा आदी गावांना याचा लाभ होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नशिराबाद नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर शहराची ओळख अधिक मजबूत झाली असून अप्पर तहसील कार्यालयामुळे महसुली कामकाज अधिक सोयीचे होईल, असा दावा करण्यात आला आहे. सदर कार्यालयासाठी आवश्यक जागा नगरपरिषदेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले असून प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!