जळगावात “हिट ॲण्ड रन”अल्पवयीन मुलाने भरधाव कारने ९ जणांना उडवलं
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगावमध्ये घडणाऱ्या हिट ॲन्ड रन च्या वाढत्या घटना अत्यंत चिंतेचा विषय बनल्या आहेत. त्यात मुक्ताईनगर तालुक्यातील हर्ताळे गावात भरधाव वेगातील एका वाहनाने पाच जणांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला होता. तसेच जळगाव शहरातील महाबळ आणि गिरणा टाकी परिसरात मद्यधुंद अवस्थेतील कार चालकांनी भररस्त्यात पादचाऱ्यांना उडविल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यात काही महिलांचा जागीच किंवा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. जळगाव तालुक्यातील वावडदा चौफुलीवर भरधाव कारने रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेसह (सुमनबाई राजपूत) दुचाकीस्वाराला उडवले होते. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली होती. तसेच जळगाव-पाचोरा मार्गावर रामदेववाडीजवळ भरधाव सुसाट कारने अंगणवाडी सेविका आणि तीन बालकांना चिरडल्याची मोठी दुर्घटना घडली होती.
आता असाच एक” हिट ॲन्ड रन” चा भयानक प्रकार घडला.
जळगाव शहरातील रामानंदनगर परिसरात एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने भरधाव कारने ९ जणांना उडविल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण अपघातात दोन दांपत्य आणि एका तरुणासह ९ जण गंभीर जखमी झाले.
जळगावात पुन्हा एकदा हिट ॲन्ड रनचा थरार पाहायला मिळाला. या घटनेने जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली.
शहरातील उच्चभ्रू आणि वर्दळीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामानंदनगर भागात एका अवघ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवत तब्बल ९ जणांना उडवले आहे. या भीषण हिट अँड रन अपघातात दोन दाम्पत्यांसह एक तरुण असे एकूण पाच जण गंभीर जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी रामानंदनगर परिसरातील गिरणा टाकी ते चर्च दरम्यान हा थरार घडला. एक १५ वर्षांचा अल्पवयीन मुलगा कार घेऊन रस्त्यावर निघाला होता. कारचा वेग इतका प्रचंड होता की, अचानक कारवरील त्याचे नियंत्रण सुटले. काही समजण्याच्या आत या भरधाव कारने रस्त्यावरून जाणाऱ्या ९ जणांना जोरदार धडक दिली. कारची धडक इतकी भीषण होती की, रस्त्यावरील पादचारी आणि दुचाकीस्वार हवेत उडून रस्त्यावर फेकले गेले.
अपघातात दोन निष्पाप दांपत्य (पती-पत्नी) आणि एका तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातातील गंभीर जखमींना तातडीनं जळगावच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कारने एका इलेक्ट्रिक दुचाकीलाही जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याचा पाय फॅक्चर झाल्याची माहिती समोर येत आहे.
अचानक झालेल्या अपघाताने अपघात घडताच घटनास्थळावर एकच गोंधळ आणि किंचाळ्यांचे आवाज ऐकू येऊ लागले. रस्त्यावरील हा भयानक प्रसंग पाहून स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शी अत्यंत संतप्त झाले. नागरिकांचा वाढता रोष आणि आपल्याला बेदम चोप मिळेल या भीतीने तो १५ वर्षांचा अल्पवयीन कारचालक आपली कार घटनास्थळावरच सोडून अंधाराचा फायदा घेत फरार झाला. त्या नंतर रस्त्यावर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्या मुळे रामानंदनगर परिसरात काही काळ प्रचंड गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती लागलीच शहरात पसरल्याने जळगाव शहर हादरले. मात्र हा अल्पवयीन मुलगा कोण? पोलिस त्याचा शोध घेत असून या सर्व प्रकरणांमध्ये संतप्त नागरिकांचा वाढता रोष पाहता पोलीस प्रशासनाकडून गुन्हे दाखल करणे आणि आरोपींना ताब्यात घेण्याची कारवाई केली जाते. मात्र, अल्पवयीन मुलांच्या हाती गाड्या देणाऱ्या पालकांवरही कडक कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा