सावद्यात भीषण अपघात ; भरधाव कारची दुचाकींना जोरदार धडक, ५ जखमी, एकाचा मृत्यू
सावदा, ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज | जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा शहरात रविवारी सायंकाळी भीषण अपघाताची घटना घडली. सावदा-रावेर मार्गावरील जेहरा मॅरेज हॉलसमोर भरधाव कारने अनेक दुचाकींना जोरदार धडक दिल्याने सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, उपचारादरम्यान एका जखमीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रस्त्यावरून जात असलेल्या तीन ते चार दुचाकींना जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना उपचारासाठी सावदा येथील रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी चार जणांवर सावद्यात उपचार सुरू असून दोन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. यापैकी एका जखमीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मयत व्यक्ती रावेर तालुक्यातील मोरगाव येथील असल्याचे समजते.
मात्र, मृत व्यक्ती रावेर तालुक्यातील मोरगाव येथील असल्याची माहिती समोर आली असून जखमींची अधिकृत ओळख अद्याप समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी पुढील तपास सावदा पोलिस करीत आहेत. (मृत्यू व जखमींबाबतची अधिकृत माहिती पोलिस प्रशासनाकडून प्राप्त झाल्यानंतरच अंतिम माहिती स्पष्ट होणार आहे.)


