भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

फैजपूरयावल

फैजपूर–हंबर्डी रस्त्यावर भीषण अपघात ; १२ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू, वडील गंभीर जखमी

फैजपूर,मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी || फैजपूर–हंबर्डी रस्त्यावर सुरू असलेल्या कामादरम्यान झालेल्या भीषण अपघातात अंजाळे येथे वास्तव्यास असलेल्या १२ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला, तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले. शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास हंबर्डी गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली. या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकासह रस्त्याचे काम करणाऱ्या ओम कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक ओम कटरे आणि संबंधित अभियंत्याविरोधात फैजपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकची दुचाकीला धडक

मृत बालकाचे नाव सलील कविराज चव्हाण (वय १२, मूळ नेपानगर, ता. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश; सध्या रा. अंजाळे, ता. यावल, जि. जळगाव) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलील हा शुक्रवारी रात्री वडील कविराज बारक्या चव्हाण यांच्यासोबत दुचाकीने (एम.पी. ६८ एम.एच. ९८९४) फैजपूरहून अंजाळे गावाकडे जात होता. दरम्यान, हंबर्डी गावाजवळ विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सलीलचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.

रस्त्याच्या कामातील निष्काळजीपणाचा आरोप

अपघातस्थळी रस्त्याचे काम सुरू होते. या कामादरम्यान आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने आणि खबरदारी न घेतल्याने अपघात घडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल, अशा प्रकारे काम सुरू असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी अर्जुन मुलसिंग बारेला (वय २५, रा. मांडवा, ता. झिरण्या, जि. खरगोन, मध्य प्रदेश; सध्या रा. अंजाळे) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रक चालक, ओम कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक ओम कटरे आणि संबंधित अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

रस्त्याचे काम सुरू असताना वाहतुकीचे योग्य नियोजन, धोक्याचे सूचना फलक, बॅरिकेड्स आणि इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे. एका निष्पाप बालकाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या अपघाताची सखोल चौकशी करून दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांची निश्चिती करावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार देवेंद्र पाटील पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!