सुकी नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक ; ट्रॅक्टर जप्त, महसूल विभागाची धडक कारवाई,
रावेर.मंडे टु मंडे न्युज || तालुक्यातील सुकी नदीपात्रातून अवैधरीत्या गौण खनिज (वाळू/रेती) वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने गुरुवारी (दि. २४ सप्टेंबर) धडक कारवाई केली. ऊटखेडा-कुंभारखेडा रस्त्यावर करण्यात आलेल्या या कारवाईत MH 30 BL 1594 क्रमांकाचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे.
रावेर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारी वाढत असल्याने तहसीलदार संजय तायडे यांनी महसूल विभागाच्या पथकाला अशा प्रकारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गुरुवारी सकाळी सुमारे ११ वाजता ऊटखेडा-कुंभारखेडा रस्त्यावर महसूल पथकाने कारवाई केली.
सुकी नदीपात्रातून अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक होत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने संबंधित मार्गावर सापळा रचून संशयित ट्रॅक्टर अडवून तपासणी केली. यावेळी ट्रॅक्टर चालक निशांत वसंत इंगळे याच्याकडे वाळू वाहतुकीसाठी आवश्यक वैध परवानगी अथवा रॉयल्टी पावती आढळून आली नाही.
तपासणीनंतर गौण खनिज वाहतुकीसंदर्भातील नियमानुसार संबंधित वाहनावर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, पुढील कार्यवाहीसाठी ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर महसूल प्रशासनाची करडी नजर असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
कारवाई करणारे पथक : तहसीलदार संजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी ऊटखेडा कैलास चव्हाण, ग्राम महसूल अधिकारी मुंजलवाडी कमलाकर हाटकर आणि ग्राम महसूल अधिकारी सहस्त्रलिंग अंकित भोगवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

