मुक्ताईनगरात तुरीच्या पिकात बी.एन.ए.कंपनीचे जेसीबी घालून तुरीची झाडे तुडविली, पिकांचे नुकसान, शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार
मुक्ताईनगर.मंडे टु मंडे न्युज.अक्षय काठोके || राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान शेतात अनधिकृतपणे जेसीबी घुसवून तुरीच्या पिकाचे नुकसान केल्याची तक्रार मुक्ताईनगर येथील शेतकरी नितीन मदनलाल जैन यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या हद्दी आणि पिकांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन जैन यांची मुक्ताईनगर शिवारातील जुन्या मलकापूर रोडलगत गट क्रमांक २३८/२/२ मध्ये शेती आहे. या शेतातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एल जात असल्याने महामार्गासाठी आवश्यक जमीन शासनाने संपादित केली आहे. मात्र, उर्वरित जमीन जैन यांच्या मालकीची असून त्यांनी या जमिनीत खरीप हंगामातील तुरीचे पीक घेतले आहे.
जेसीबी शेतात घुसल्याची माहिती
४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजता जैन यांच्या शेतात काम करणाऱ्या राजेंद्र शिवराम जुमळे यांनी फोन करून शेताच्या जवळील सर्व्हिस रोडलगत गटारीचे काम करण्यासाठी आलेल्या बी.एन.ए. कंपनीच्या जेसीबीने शेतात प्रवेश केल्याची माहिती दिली. जेसीबीमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान होत असल्याचे समजल्यानंतर नितीन जैन हे त्यांचे चुलत भाऊ सुगन जैन यांच्यासह शेतात पोहोचले.
त्यावेळी एमएच १९ ईजी ३२०८ क्रमांकाचा जेसीबी शेतात काम करताना दिसल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. जेसीबीखाली तुरीची झाडे तुडवली जाऊन पिकाचे नुकसान झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कंपनीच्या कर्मचाऱ्याचे नाव तक्रारीत
जेसीबी चालकाला काम थांबवण्यास सांगून विचारणा केली असता, त्याने आपले नाव प्रमोद राजेंद्र यादव असून तो बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगितल्याचे जैन यांनी तक्रारीत नमूद केले आहे. संबंधित जेसीबी संतोष सिंग यांच्या सांगण्यावरून आणल्याचे चालकाने सांगितल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे. यानंतर संतोष सिंग यांना घटनास्थळी बोलावण्यात आले; मात्र त्यांनी काहीही न बोलता तेथून निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या कामामागे प्रतिक अग्रवाल यांचा सहभाग असावा, असा संशयही तक्रारदाराने व्यक्त केला आहे.
महसूल विभागाकडून नुकसानीचा पंचनामा
घटनेनंतर शेतकऱ्याने तलाठ्यांना माहिती दिली. त्यानुसार महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेताची पाहणी करून पंचांसमक्ष पिकाच्या नुकसानीचा पंचनामा केल्याचे कागदपत्रांत नमूद आहे. पंचनाम्यात जेसीबीमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. तक्रारीत सुमारे ९० ते १०० तुरीच्या झाडांचे नुकसान झाल्याचा उल्लेख आहे, तर पंचनाम्याच्या उपलब्ध मजकुरात ५० ते ५५ झाडे जमीनदोस्त झाल्याचे नमूद आहे.
या प्रकरणी नितीन जैन यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित कंपनी, जेसीबी चालक आणि इतर व्यक्तींची जबाबदारी निश्चित करून पोलिसांकडून काय कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

