Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नगरपालिकासावदा

दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना करांचा आर्थिक बोजा कशाला? घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीला तात्पुरती स्थगिती द्या- नगरसेवक सुरज परदेशी यांची मागणी

सावदा नगरपालिकेकडे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन

सावदा, मंडे टू मंडे न्यूज नेटवर्क | सर्वत्र दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई आणि वाढत्या महागाईमुळे नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असताना घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा बोजा आणखी कशाला? असा सवाल उपस्थित करत सावदा नगरपालिकेने घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी, अशी ठाम मागणी नगरसेवक तथा शिवसेनेचे शहराध्यक्ष सुरज परदेशी यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नागरिक आर्थिक अडचणीत असताना नगरपालिका प्रशासनाने संवेदनशील भूमिका घेऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

सावदा शहरातील सर्वसामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक, शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना सध्या अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, तर दुसरीकडे पाणीटंचाईसारख्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्याचा अतिरिक्त आर्थिक ताण नागरिकांवर पडत असल्याने नगरपालिका प्रशासनाने वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखणे आवश्यक असल्याचे परदेशी यांनी म्हटले आहे.

थकबाकीच्या नावाखाली कठोर कारवाई नको!

नागरिकांच्या अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीला तात्पुरती स्थगिती देण्याबाबत नगरपालिकेने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच केवळ आर्थिक अडचणींमुळे कर भरण्यास विलंब होत असल्यास थकबाकीच्या कारणास्तव नागरिकांवर कोणतीही कठोर कारवाई करण्यात येऊ नये आणि त्यांना आवश्यक आर्थिक दिलासा द्यावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.

प्रशासनाच्या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष!

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची असून, सध्याच्या परिस्थितीत नागरिकांच्या अडचणींना प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे सुरज परदेशी यांच्या मागणीवर सावदा नगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी कोणता निर्णय घेते, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!