भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

तापी नदीत प्रेमविवाहित जोडप्याचे मृतदेह आढळल्याने खळबळ ; पायांना साखळी बांधून कुलूप, घातपात की आत्महत्या?

जळगाव.मंडे टु मंडे न्युज || शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील तापी नदीत प्रेमविवाह केलेल्या तरुण पती-पत्नीचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत दाम्पत्याचे पाय लोखंडी साखळीने एकमेकांना बांधून त्याला कुलूप लावलेले असल्याचे समोर आले आहे. या संशयास्पद घटनेमुळे मृत्यूमागील नेमके कारण काय, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. श्याम हरी पाटील (वय २८) आणि सपना पाटील (वय २०) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे मूळचे अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील रहिवासी असून सध्या एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे वास्तव्यास होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास नरडाणा येथील तापी नदीत दोघांचे मृतदेह तरंगताना आढळले. घटनेची माहिती मिळताच नरडाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक सचिन कापडणीस आणि त्यांच्या पथकाने नदीतून दोन्ही मृतदेह बाहेर काढले. यावेळी श्यामचा डावा पाय आणि सपनाचा उजवा पाय लोखंडी साखळीने एकमेकांना बांधलेला असून साखळीला कुलूप लावलेले असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूच्या कारणाबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

प्रेमविवाहानंतर सुरू केला होता संसार

श्याम पाटील याचे कुटुंब काही वर्षांपूर्वी कामानिमित्त पाडळसरे येथून उत्राण येथे स्थलांतरित झाले होते. श्याम शेतीची कामे करून तसेच ट्रॅक्टर चालवून उदरनिर्वाह करत होता. उत्राण येथे बहिणीकडे राहणाऱ्या सपनाशी त्याची ओळख झाली. पुढे या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले आणि दोघांनी मे महिन्यात प्रेमविवाह केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मृत्यूच्या तीन ते चार दिवसांपूर्वी हे जोडपे बाहेरगावी गेले होते, असे सांगितले जात आहे. त्यानंतर दोघांचे मृतदेह तापी नदीत आढळल्याने त्यांच्या प्रवासाबाबत आणि मृत्यूच्या परिस्थितीबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

आत्महत्या की घातपात? तपासातून उलगडणार गूढ

दाम्पत्याचे पाय लोखंडी साखळीने एकमेकांना बांधलेले आणि साखळीला कुलूप लावलेले आढळल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. हा आत्महत्येचा प्रकार आहे की यामागे अन्य काही कारण अथवा घातपात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून सर्व शक्यता विचारात घेऊन तपास केला जात आहे.

शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेने पाडळसरे, उत्राण आणि नरडाणा परिसरात हळहळ व्यक्त होत असून श्यामच्या पश्चात आई आणि लहान भाऊ असल्याची माहिती मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!