सावदा परिसरातील बड्या व्यावसायिकाकडे आयकर विभागाची ‘रेड’? कोट्ट्यावधींच्या रकमेची चर्चा ; प्रकरण दडपल्याच्या चर्चेने खळबळ!
सावदा.मंडे टु मंडे न्युज. | रावेर तालुक्यातील सावदा शहराजवळील लहान वाघोदा (वाघोदा बुद्रुक, ता. रावेर) येथे एका बड्या व्यावसायिकाच्या व्यवसायाच्या ठिकाणी तसेच निवासस्थानी आयकर विभागाने नुकतीच छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे. या कथित कारवाईमुळे लहान वाघोदा आणि परिसरात चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यावसायिकाच्या व्यावसायिक ठिकाणासह घराचीही तपासणी करण्यात आल्याची चर्चा आहे. या तपासणीत कोट्यावधी रुपयांची रक्कम आढळल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, या कारवाईचे नेमके स्वरूप, तपासणीत आढळलेल्या रकमेचा तपशील आणि संबंधित प्रकरणातील अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
दरम्यान, एवढ्या मोठ्या रकमेच्या चर्चेनंतरही हे प्रकरण आर्थिक व्यवहारातून दडपण्यात आल्याची कुजबुज परिसरात सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
आयकर विभागाची कारवाई नेमकी कशासाठी झाली? तपासणीत खरोखरच कोट्यवधींची रक्कम आढळली का? तसेच प्रकरण दडपल्याच्या चर्चेत तथ्य आहे का? या प्रश्नांची उत्तरे अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच स्पष्ट होतील. या संदर्भात आणखी अशीही चर्चा आहे की, सदरील “रेड ” ही जीएसटी (GST) विभागाची होती. मात्र नक्की काय? हे अद्याप समोर आलेले नाही.
या कथित कारवाईबाबत आयकर विभाग किंवा जीएसटी विभाग या संबंधित अधिकाऱ्यांकडून अधिकृत खुलासा होतो का, याकडे आता लहान वाघोदा सह सावदा आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


