जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली, रोहन घुगे नवे जिल्हाधिकारी !
जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली झाली आहे. आयुष प्रसाद यांची नाशिक येथे बदली झाली असून त्यांच्या जागी आता रोहन घुगे हे नवीन जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेणार. याबाबतचे आदेश आज निर्गमीत करण्यात आले आहेत.
राज्य सरकारकडून आज (दि.०७) १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (IAS Officer Transfer) केल्या आहेत. यामध्ये सध्या जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे हे पदभार घेणार आहे.
या आदेशानुसार, श्री. रोहन घुगे यांनी आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सुपूर्द करून, जळगाव जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार श्री. आयुष प्रसाद, भाप्रसे यांच्याकडून त्वरित स्वीकारावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, बदलीनंतर रूजू अहवाल Supremo प्रणालीवर (ER Sheet मधील Posting कॉलममध्ये) अद्ययावत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कार्यभार हस्तांतरण करताना शासनाने दिनांक १७ नोव्हेंबर २०२० रोजी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही नमूद केले आहे. नवीन पदावर रूजू झाल्यानंतर पूर्वीच्या पदावरील अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल व कार्यमूल्यांकन अहवाल विहीत वेळेत लिहावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.


