भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

“माझ्या अंगात पीर बाबा येतात” भोंदूबाबा आणि पोलीस पत्नी कडून अघोरी पूजेच्या नावाखाली मैत्रिणीची लाखोंची फसवणूक ; तक्रार देऊन चार वर्षांनंतरही पोलीस तपासात अपयश

जळगाव. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव मध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. एका भोंदू बाबाने करणी, बाधा दूर करण्यासाठी अघोरी विधी करत यू महिलेची लाखो रुपयांची फसवणूक केली होती. विशेष म्हणजे, या साऱ्या प्रकारात त्या भोंदूची पोलीस कर्मचारी असलेली पत्नीही सहभागी होती. तब्बल चार वर्षे उलटून देखील गुन्हा दाखल असलेल्या या प्रकरणाचा तपास पुढे सरकलेला नाही. त्यामुळं पीडित महिलेने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केलीय.

नाशिकच्या घटने नंतर राज्यात अनेक भोंदू बाबांच्या घटना उघडकीस येत असताना  त्याचीच पुनरावृत्ती आता जळगाव शहरात उघडकीस आली असून, एका भोंदूबाबाने त्याच्या पोलीस पत्नीच्या संगनमताने जळगाव मधील भिकामचंद जैन नगर परिसरातील एका ग्राफिक डिझायनर महिलेची तब्बल ११ ते १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कथित भोंदूबाबा ललित पाटील आणि त्याची पत्नी, महिला पोलीस कर्मचारी महिमा उर्फ मनोरमा पाटील यांच्यावर २०२२ मध्ये रामानंद पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, साडेतीन ते चार वर्ष उलटून गेल्यानंतरही हे दोन्ही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

पीडित महिला आणि आरोपी महिमा  उर्फ मनोरमा या दोघींची कॉलेज जीवनापासूनची मैत्री होती. याच विश्वासाचा गैरफायदा घेत महिमाने आपल्या मैत्रिणीला जाळ्यात ओढले. पीडितेच्या घरात कौटुंबिक कलह सुरू असल्याने तिने आपल्या मैत्रिणीशी संपर्क साधला होता. तेव्हा महिमाने तिचा पती ललित पाटील याच्या अंगात ‘पीर बाबा’ येत असून त्याच्याकडे अलौकिक शक्ती असल्याचा खोटा दावा केला. त्यानंतर ललितने अघोरी विद्येचे नाटक सुरू करत, “तुझ्या पतीच्या भावाने आपले जीवन संपवले असून त्याचा आत्मा घरात भटकत आहे. तोच या सर्व वादांचे मूळ आहे,” अशी भीती पीडितेला घातली.

​घरावरील ही कथित बाधा कायमची दूर करण्यासाठी आणि ‘गुप्तधन’ मिळवून देण्याच्या बहाण्याने या भामट्या दाम्पत्याने पीडित महिलेकडून वेळोवेळी लाखो रुपये उकळण्यास सुरुवात केली. हे सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. पूजेच्या नावाखाली या भोंदूबाबाने पीडितेला उज्जैन येथील स्मशानभूमी, गोगामेडी, पुष्कर, अजमेर, ओंकारेश्वर आणि अगदी भारत-पाकिस्तान सीमा येथील माता मंदिरात नेऊन विविध कथित विधी केले. एवढेच नाही तर, सर्व ठिकाणाहून परतल्यानंतर आरोपींनी काही काळ पीडितेच्या घरातच मुक्काम ठोकला आणि पैशांची मागणी सुरूच ठेवली. बाहेरून कर्ज काढून मोठ्या प्रमाणावर पैसे दिल्यावरही घरात कोणतीही शांतता न आल्याने, पीडितेने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिचे पैसे परत मागण्यास सुरुवात केली. तेव्हा “मी अघोरी असून पैसे परत मागितल्यास तुझ्या सात पिढ्यांचा नाश करेन,” अशी भयंकर धमकी ललितने दिली.

​आरोपी महिमा ही भंडूप येथे कर्तव्यावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, परंतु तिथेही ती आढळून आली नाही. एका पोलीस कर्मचाऱ्यानेच अशा प्रकारचा गुन्हा केल्यामुळे तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. न्याय मिळण्याच्या आशेने नुकतीच तिने जळगाव पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आरोपींचा शोध घेण्याची आणि आपले पैसे मिळवून देण्याची विनंती केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!