बेलव्हाय – सुनसगाव परिसरात महसूल-पोलीसांची संयुक्त धडक कारवाई; १७३ ब्रास वाळूसह दोन डंपर जप्त
भुसावळ,मंडे टु मंडे न्युज | भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय व सुनसगाव परिसरात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल विभाग व भुसावळ तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणात वाळू जप्त केली. बेलव्हाळ येथे तीन ठिकाणी साठवून ठेवलेले १६५ ब्रास वाळूचे साठे जप्त करण्यात आले असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सुनसगाव रस्त्यावर दोन डंपरमधील ८ ब्रास वाळूसह सुमारे २० लाख रुपयांची वाहने जप्त करण्यात आली आहेत.
भुसावळ तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी सायंकाळी सुमारे ५.२० वाजता बेलव्हाळ गावाजवळील वाघूर नदीपात्रातून विनापरवाना वाळूचे उत्खनन करून चोरट्या विक्रीच्या उद्देशाने तीन ठिकाणी वाळूचे ढीग करून ठेवल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी रमेश श्रावण सोनवणे, गौरव रमेश सोनवणे आणि अविनाश चंद्रकांत पवार (सर्व रा. बेलव्हाळ, ता. भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान वाघूर नदीपात्रातील ५० ब्रास, बेलव्हाळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ६५ ब्रास आणि निमगाव रस्त्यावर ५० ब्रास, असा एकूण १६५ ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला. या संदर्भात बेलव्हाळच्या ग्राम महसूल अधिकारी सुनिता अमरसिंग वळवी यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली.या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३४/२०२६ नोंद करण्यात आला असून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम ४८ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, २२ जुलै रोजी पहाटे सुनसगाव येथील वाघूर नदी पुलाजवळ अवैध वाळू वाहतुकीवरही पोलिसांनी धडक कारवाई केली. डंपर क्रमांक एमएच १९ झेड ०९३२ वरील चालक अनिल सुपडू सोनवणे (रा. बांभोरी, ता. धरणगाव) हा सुमारे ३ ब्रास वाळूची चोरी करताना आढळून आला. त्याच्याकडील सुमारे १२ हजार रुपयांची वाळू आणि डंपर जप्त करण्यात आला. हवालदार महेश एकनाथ चौधरी यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याच दिवशी डंपर क्रमांक यूपी ५३ जीटी ११७१ वरील चालक आकाश सुरेश पारधी (रा. धानोरा, ता. चोपडा) हा सुमारे ५ ब्रास वाळूसह आढळून आला. अंदाजे २० हजार रुपयांची वाळू आणि संबंधित डंपर जप्त करून त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही डंपरची किंमत मिळून सुमारे २० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही संयुक्त कारवाई भुसावळ तहसीलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी प्रवीण पाटील, तलाठी सुनिता वळवी, गोपाळ भगत, रुपेश लिधुरकर, प्रमोद ठोसर, साधना खुळे, सुनील कचगुड्डे, कविता तायडे, निशा गायकवाड, कोतवाल संजय गोसावी, इम्रान शेख तसेच भुसावळ पोलीस उपविभागीय अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व त्यांच्या पथकाने केली. बेलव्हाळ प्रकरणाचा तपास पोहेकॉ विकास बाविस्कर, तर सुनसगाव येथील दोन्ही गुन्ह्यांचा तपास ग्रेडेड उपनिरीक्षक संजय कंखरे आणि हवालदार धीरज मंडलिक करीत आहेत.या सलग कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून चोरट्या वाळू वाहतुकीत गुंतलेल्या अनेकांनी आपली वाहने थांबविल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.


