खिर्डी खु.येथील अतिक्रमण धारकांना हक्काचे घर मिळणार कधी? लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष..
Monday To Monday NewsNetwork।
खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी)। रावेर तालुक्यातील खिर्डी खु. या गावी नवीन गावठाण मध्ये सुमन बाई कडू पाटील हि विधवा महिला गेली तीस ते पस्तीस वर्षे पासून सरकारी जागेवर झोपड वजा कच्चे घर बांधून वास्तव्य करीत आहे.तसेच घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्या आपल्या कुटुंबाचा रहाट गाडा मिळेल ते काम करून चालवत आहे.सन २००२ मध्ये ज्या ठिकाणी वास्तव्य करीत होते त्या जागेवर हल्ली पाण्याची टाकी बांधलेली आहे त्यांना तत्कालीन सरपंच यांनी पर्यायी जागा दिली परंतु शासनाने वेळोवेळी अतिक्रमण नियमानुकुल करण्याचा निर्णय घेतलेला असून सुध्दा आज पर्यंत त्यांना स्वमालकीची जागा उपलब्ध नसल्याने घरकुलाचा लाभ मिळण्यास पात्र असूनही त्यांना अद्यापही घरकुल मिळाले नाही.
ज्या लाभार्थ्याला स्वतची जागा नसते अशा बेघर भूमिहीन गोरगरिबांना हक्काचे छप्पर लाभावे या दृष्टिकोनातून घरकुले बांधण्यासाठी लाभार्थ्यांना अनुदान दिले जात असल्याचे सरकार दरबारी सांगण्यात येत असून तरी प्रत्यक्षात घरकुलाच्या लाभार्थ्यांची पदोपदी अडवणूक होत असून घरकुलाच्या जागेपासून ते मिळणाऱ्या निधीपर्यंत असंख्य अडथळे लाभार्थ्यांना पार करावे लागतात.ग्रामीण बेघरांची अतिक्रमणे नियमित करण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने १६फेब्रुवारी २०१८ रोजी एक शासन निर्णय जाहीर केला असून अतिक्रमित कुटुंबाकडून जी रक्कम वसूल केली जात आहे ती बाजारभावा पेक्षाही जास्त आहे. सरकारने मोडीत काढलेल्या जुन्या गावठाण विस्तार योजनेत शेतमजुरांना एक हजार फूट जागा विनाशुल्क उपलब्ध करून देण्याची तरतूद होती. आता ही तरतूदच संपुष्टात आली असून गावठाण क्षेत्रात कसेबसे राहणाऱ्यांना जमिनीवरूनच हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
घरकुलांचा लाभ देताना अनेकदा प्रशासकीय यंत्रणेकडून निर्देशांची पायमल्ली होत आहे. भूमिहीन,बेघर, शेतमजूर यांना निवारा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने अनेक शिफारशी केल्या मात्र कोणतीही तरतूद केली नाही.तसेच १८ ते ५९ वयोगटातील परित्यक्ता, विधवांना पंतप्रधान आवास योजनेत स्वतंत्र घरकुल देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.तसेच मी ज्या ठिकाणी वास्तव्य करीत आहे ती जागा नियमानुकुल करून मला हक्काचे घर मिळावे अशी मागणी सुमनबाई पाटील व अतिक्रमण धारक यांनी केली आहे.


