जळगाव जिल्ह्यात कापूस बियाण्याचा लाखो रुपयांचा मोठा साठा जप्त, जिल्ह्यात खळबळ
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेला कापूस बियाण्याचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला. जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवण्यात आलेल्या अनधिकृत कापूस बियाण्याच्या मोठ्या साठ्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ९,१५,४१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, खरीप हंगामाच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे बनावट व अवैध बियाण्यांच्या व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,न जामनेर शहरातील साईनगर परिसरात दीपक राजमल चौधरी यांच्या घरात अनधिकृतरित्या कापूस बियाण्यांचा साठा करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान घरामध्ये एकूण ४० गोण्या आणि १ हजार १६ बियाण्यांची पॅकेट्स जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या पॅकेट्सवर विविध कंपन्यांची नावे, बॅच क्रमांक आणि उत्पादनासंबंधी तपशील नमूद करण्यात आले होते.जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांमध्ये ‘दिया-५९’ या वाणाची ४५० पॅकेट्स तर ‘क्रीश-४५’ या वाणाची ५६६ पॅकेट्स असल्याचे आढळून आले पोलिसांनी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या केलेल्या तपासादरम्यान संबंधित व्यक्तीकडे बियाणे विक्रीसाठी आवश्यक असलेला वैध परवाना, साठा परवाना तसेच विक्री आणि वितरणासंबंधीची कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे उघड झाले.
याशिवाय जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांची खरेदी कोठून करण्यात आली, त्याचा पुरवठादार कोण आहे आणि ते अधिकृतरीत्या बाजारात विक्रीसाठी मंजूर आहेत का, याबाबत कोणतेही समाधानकारक पुरावे सादर करण्यात आले नाहीत.या प्रकरणी दीपक राजमल चौधरी (रा. साईनगर, जामनेर), गुलाब आधार पाटील, शेषराव पाटील (दोन्ही रा. वर्दी, ता. पाचोरा) तसेच अन्य संबंधित व्यक्तींविरुद्ध पंचायत समितीच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

