भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

मोठी बातमी : खाद्य पदार्थांसाठी वर्तमानपत्राचा कागद वापरता येणार नाही, सक्त आदेश

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | अन्नपदार्थ पॅक करण्यासाठी, साठवण्यासाठी किंवा वाढण्यासाठी वर्तमानपत्रांचा (News paper) वापर करणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. यावर पूर्ण बंदी असून भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) विक्रेते व नागरिकांना कडक आदेश दिले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) खाद्यपदार्थांची पॅकिंग, साठवणूक किंवा पदार्थ वाढण्यासाठी वृत्तपत्रांचा (रद्दी) वापर करण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. अन्नपदार्थ बांधण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर केल्यास विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार कडक दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

मुंबईतील प्रसिद्ध वडापाव विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या संयुक्त कारवाईनंतर आता खाद्यपदार्थांच्या पॅकिंगबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफएसएसएआयने (FSSAI) स्पष्ट आदेश देत खाद्यपदार्थ गुंडाळण्यासाठी किंवा पॅकिंगसाठी वर्तमानपत्रांचा वापर पूर्णपणे टाळण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबईसह राज्यातील अनेक भागांत वडापाव, भजी, समोसे आणि इतर खाद्यपदार्थ देताना अजूनही वर्तमानपत्रांचा वापर केला जातो. मात्र हा प्रकार ग्राहकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करणारा असल्याचे एफएसएसएआयने स्पष्ट केले आहे. अन्न सुरक्षा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ग्राहक आणि विक्रेते दोघांनीही जागरूक राहणे गरजेचे आहे.

का आहे वृत्तपत्राचा कागद धोकादायक?
तज्ज्ञांच्या मते वृत्तपत्र छापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये अनेक हानिकारक रसायने असतात. यात शिसे, जड धातू, रंगद्रव्ये, बाइंडर्स आणि इतर रासायनिक घटकांचा समावेश असतो. गरम किंवा तेलकट पदार्थ वर्तमानपत्रात ठेवले असता ही रसायने थेट अन्नामध्ये मिसळू शकतात. दीर्घकाळ अशा अन्नाचे सेवन केल्यास कर्करोग, पचनाचे विकार, हार्मोनल समस्या आणि इतर गंभीर आजार उद्भवू शकतात.

याशिवाय वर्तमानपत्रांचे वितरण, वाहतूक आणि हाताळणी अनेक अस्वच्छ ठिकाणी होत असल्याने त्यावर धूळ, जंतू आणि बॅक्टेरिया साचलेले असतात. त्यामुळे अन्नजन्य आजारांचा धोका अधिक वाढतो.

वडापाव विक्रेत्यांवर कारवाई
मुंबईतील अनेक प्रसिद्ध वडापाव स्टॉल्सवर अलीकडे FDA आणि महापालिकेच्या संयुक्त पथकाने धाड टाकून तपासणी केली होती. या कारवाईदरम्यान अस्वच्छता, परवान्यांतील त्रुटी आणि वर्तमानपत्रांचा वापर आढळून आला. त्यानंतरच प्रशासनाने कठोर भूमिका घेत राज्यभर सूचना जारी केल्या आहेत.

विक्रेत्यांना सूचना?
एफएसएसएआयने विक्रेत्यांना बटर पेपर, फूड-ग्रेड पेपर किंवा सुरक्षित पॅकिंग साहित्य वापरण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

काय काळजी घ्यावी ग्राहकांनी?

  • गरम पदार्थ वर्तमानपत्रात दिल्यास ते घेणे टाळावे
  • फूड-ग्रेड पॅकिंग वापरणाऱ्या विक्रेत्यांना प्राधान्य द्यावे
  • अस्वच्छता दिसल्यास FDA किंवा स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करावी
  • मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना अशा पदार्थांपासून दूर ठेवावे

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, स्ट्रीट फूड विक्रेते (लॉरीवाले), आणि मिठाई विक्रेत्यांनी खाद्यपदार्थ देण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर अजिबात करू नये. असे कडक आदेश देण्यात आले असून खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी किंवा जास्तीचे तेल शोषून घेण्यासाठी नेहमी फूड-ग्रेड पेपर, टिश्यू पेपर, बटर पेपर किंवा स्वच्छ सुती कापडाचा वापर करा [

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!