अवघ्या ५०० रुपयांत थायलंड सहलीचे आमिष; १२ महिलांची फसवणूक, पालकमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर; ७१ वर्षीय संशयित महिलेवर गुन्हा
मंडे टु मंडे न्युज | अवघ्या ५०० रुपयांत थायलंडची आठ दिवसांची सहल घडवून आणण्याचे आमिष दाखवत १२ हून अधिक महिलांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात समोर आला आहे. या प्रकरणात ७१ वर्षीय संशयित महिलेने पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या नावाचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे.
जवाहर कॉलनी परिसरातील महिलांना एकत्र करून समतानगर येथील संशयित शोभा उत्तम देवकर हिने, “पालकमंत्री संजय शिरसाट नागरिकांना थायलंड सहलीवर पाठवत आहेत. प्रत्येक महिलेने केवळ ५०० रुपये भरायचे असून उर्वरित खर्च पालकमंत्री करणार आहेत,” असे सांगितले. या आश्वासनामुळे महिलांचा तिच्यावर विश्वास बसला.विश्वास संपादन करण्यासाठी संशयित महिलेने महिलांकडून आधारकार्ड आणि छायाचित्रेही जमा केली. तसेच, आणखी महिलांना या सहलीसाठी सोबत आणण्याचे आवाहन केले. त्यानंतर ३ ऑगस्ट रोजी १२ महिलांकडून प्रत्येकी ५०० रुपये, असे सुमारे ६ हजार रुपये जमा करण्यात आल्याची माहिती आहे.
सहलीसाठी ७ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्या दिवशी संशयित महिलेने “एक विमान आधीच निघून गेले आहे. आता आपण दुसऱ्या विमानाने जाऊ,” असे सांगत आणखी काही दिवसांची मुदत मागितली. यामुळे महिलांना संशय आला आणि त्यांनी या प्रकरणाची माहिती संबंधितांपर्यंत पोहोचवली. या प्रकाराची माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.
जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन कुंभार यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत एका महिला पोलिस अंमलदाराला साध्या वेशात संशयित महिलेच्या संपर्कात पाठवले. विशेष म्हणजे, संशयित महिलेने महिला पोलिस अंमलदारालाही “५०० रुपये भरा, तुम्हालाही थायलंडला घेऊन जाते,” अशी ऑफर दिल्याचे पोलिस तपासात समोर आले.
यानंतर पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेत तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या फसवणुकीला बळी पडलेल्या महिलांमध्ये पालकमंत्र्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील महिलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणामागे आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच अशाच प्रकारे आणखी महिलांची फसवणूक झाली आहे का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.


