भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीय

अशोकधाम मंदिरात आक्रोश आणि किंकाळ्या! चेंगराचेंगरीत ७ भाविकांचा मृत्यू, ८ जखमी

मंडे टु मंडे न्युज | श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी बिहारमधील प्रसिद्ध अशोकधाम मंदिराबाहेर मोठी दुर्घटना घडली. मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. जखमींवर लखीसराय येथील सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, रात्रीच्या वेळी तारांसह एक विजेचा खांब मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोसळला होता. सोमवारी सकाळी मोठ्या संख्येने भाविक जलाभिषेकासाठी मंदिर परिसरात जमले होते. याचदरम्यान खांबामध्ये वीजप्रवाह असल्याची अफवा पसरल्याने भाविकांमध्ये अचानक घबराट निर्माण झाली.


घाबरलेले भाविक सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी एकाच वेळी वेगवेगळ्या दिशेने धावू लागले. त्यामुळे मोठी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत अनेक भाविक खाली पडले आणि त्यात काहींचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदतीसाठी धावलेल्या स्थानिक नागरिकांनी जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


श्री इंद्रदमनेश्वर महादेव मंदिर म्हणूनही ओळखले जाणारे अशोकधाम मंदिर हे बिहारमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. येथे उत्खननादरम्यान सापडलेल्या मोठ्या शिवलिंगामुळे या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व आहे. श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!