नववी, अकरावीचे विद्यार्थीही आता पुढच्या वर्गात ; १० वी, १२ वीच्या परीक्षा ऑफलाईनच
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई (वृत्तसेवा)। महाराष्ट्रात कोरोना संक्रमणाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर, मागील शनिवारी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न देता थेट पुढील इयत्तेत प्रवेश दिला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट पास करत पुढच्या वर्गात वर्गोन्नती देण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच १० वी आणि १२ वी च्या परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत.
कोरोनामुळे यंदा संपूर्ण वर्ष विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद होत्या. तसेच कॉलेजसही बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत होते. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शालेय शिक्षण विभागाने राज्य मंडळाशी संलग्न असणाऱ्या शाळांमधील नववी आणि अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जातील. मात्र, तसेच १० वी आणि १२ वीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याची घोषणा मागील शनिवारी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. परंतु, परीक्षा ऑफलाईन घेण्याला विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवताना आंदोलने केली. मात्र, असे असतानाही शिक्षण विभागाने परीक्षा ऑफलाईनच घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णयाची घोषणा केली जाईल.


