भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

ब्रेकिंग : नशिराबाद शिवारात मानवी कवटी ; बेकायदेशीर हालचालीची चर्चा, परिसरात खळबळ, गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर आव्हान

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | नशिराबाद येथील महालक्ष्मी चौफुलीजवळील शिवारात एका पडीक शेतामध्ये मानवी कवटी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हे शेत अनेक वर्षांपासून पडीक असून या ठिकाणी बाभळीची दाट झाडे आहेत. याचा फायदा घेत घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, कवटी वैज्ञानिक तपासणीसाठी नाशिक आणि धुळे येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथील डॉ. दिलीप चौधरी यांच्या मालकीच्या गट क्रमांक ९८५ मधील पडीक शेतात ही कवटी आढळली. या संदर्भात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा नगरसेवक लालचंद पाटील यांनी नशिराबाद पोलिसांना माहिती दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी पाहणी केली.

तपासादरम्यान पोलिसांनी संपूर्ण परिसराची कसून झडती घेतली. कवटी आढळलेल्या ठिकाणासह संपूर्ण शेतात इतर मानवी अवशेष, हाडे किंवा संशयास्पद वस्तूंचा शोध घेण्यात आला. मात्र, प्राथमिक तपासात कवटीशिवाय अन्य कोणतेही मानवी अवशेष आढळून आले नसल्याचे समोर आले.

घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी कवटी ताब्यात घेतली असून तिचे नमुने पुढील वैज्ञानिक तपासासाठी नाशिक व धुळे येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविले आहेत. संबंधित अहवाल प्राप्त झाल्यानंतर कवटी किती जुनी आहे, ती पुरुषाची की महिलेची, तसेच तिची ओळख पटविण्याच्या दृष्टीने तपासाला दिशा मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, ज्या शेतात ही कवटी सापडली ते शेत अनेक वर्षांपासून पडीक असून संपूर्ण परिसर दाट बाभळीच्या झाडांनी व्यापलेला आहे. या झाडीचा गैरफायदा घेऊन परिसरात बेकायदेशीर हालचाली होत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगली आहे. त्यामुळे संबंधित शेतातील झाडी तातडीने हटविण्याची मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केली आहे.

मानवी कवटी त्या ठिकाणी कशी पोहोचली, ती कोणाची आहे आणि हा प्रकार किती जुना आहे, याबाबत अद्याप कोणताही निष्कर्ष समोर आलेला नाही. त्यामुळे या घटनेबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, फॉरेन्सिक अहवालानंतरच या प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी सांगितले की, “या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील तपास अधिक गतीने केला जाईल.” पुढील तपास नशिराबाद पोलीस करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!