उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! सरकारी डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिसवर निर्बंध
संभाजीनगर, मंडे टु मंडे न्युज |छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत असताना खाजगी प्रॅक्टिस करण्यास मनाई करणारा महत्त्वाचा निर्णय दिला आहे “सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत असताना खाजगी प्रॅक्टिस करता येणार नाही,” असे स्पष्ट करत न्यायालयाने यासंदर्भातील याचिका फेटाळून लावली आहे,
छत्रपती संभाजीनगर मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासनाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय खासगी प्रॅक्टिस करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निर्बंधांना आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावत न्यायालयाने राज्य सरकारची भूमिका कायम ठेवली.
न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले की, महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार शासकीय वैद्यकीय अधिकारी हे पूर्णवेळ सरकारी सेवेसाठी नियुक्त असतात. त्यामुळे त्यांनी आपला संपूर्ण वेळ, ज्ञान आणि कौशल्य सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठीच वापरणे अपेक्षित आहे. सरकारी सेवेत असताना खासगी वैद्यकीय व्यवसाय करणे हे नियमांच्या तसेच सार्वजनिक हिताच्या विरोधात असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयाचे राज्याच्या आरोग्य विभागाने स्वागत केले असून, यामुळे शासकीय रुग्णालयांमधील आरोग्यसेवा अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
रुग्णांना काय होणार फायदा?
या निर्णयाचा सर्वाधिक लाभ ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना होण्याची शक्यता आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची उपस्थिती वाढेल, उपचारासाठी अधिक वेळ उपलब्ध होईल आणि रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास मदत होईल. सरकारी डॉक्टर खासगी प्रॅक्टिसमध्ये वेळ घालवत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. या निर्णयामुळे अशा तक्रारींना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सरकारची बाजू कोणी मांडली?
या प्रकरणात राज्य सरकारच्या वतीने सहायक शासकीय अभियोक्ता अतुल काळे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. तसेच आरोग्य विभागाचे विधी सल्लागार ॲड. सतीश भेंडेकर यांनी आवश्यक कायदेशीर कागदपत्रे, समन्वय आणि शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी सहकार्य केले.


