पाडळसेचे पोलीस पाटील सुरेश खैरनार यांना ‘आदर्श पोलीस पाटील’ पुरस्कार
राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशनतर्फे धुळे येथे सन्मानपत्र देऊन गौरव
पाडळसे.ता. यावल. मंडे टु मंडे न्युज | फैजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाडळसे गावाचे पोलीस पाटील सुरेश वामन खैरनार यांच्या उल्लेखनीय व उत्कृष्ट सेवेची दखल घेत, त्यांना ‘आदर्श पोलीस पाटील’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशनच्या वतीने आज, २ ऑगस्ट २०२६ रोजी धुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमात त्यांना हे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
शांतता व सुव्यवस्थेतील मोलाचे योगदान
सुरेश खैरनार यांनी पाडळसे गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, शांतता समितीच्या माध्यमातून वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी आणि पोलीस प्रशासन व जनता यांच्यात उत्तम समन्वय साधण्यासाठी नेहमीच तत्परतेने कार्य केले आहे. कोरोना काळ असो किंवा गावातील विविध उत्सव, त्यांनी बजावलेली कर्तव्यदक्ष सेवा कौतुकास्पद राहिली आहे. त्यांच्या याच सामाजिक बांधिलकीची आणि प्रामाणिक सेवेची दखल घेऊन फाउंडेशनतर्फे हा गौरव करण्यात आला.
सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
हा पुरस्कार मिळाल्याचे वृत्त समजताच फैजपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी, पाडळसे व परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि मित्र परिवाराकडून सुरेश खैरनार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पुरस्कारामुळे पाडळसे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


