मध्यप्रदेशातून भुसावळ मध्ये गांजा तस्करी, लाखो रुपयांचा गांजा जप्त
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी पहाटे भुसावळ मध्ये मोठी कारवाई करत मध्यप्रदेशातून आलेल्या गांजा तस्कराला गांजा सह रंगेहात अटक केली. त्याच्याकडून तब्बल १० किलोहून अधिक गांजा आणि वाहन व मोबाईलसह एकूण २.९० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पहाटे सुमारे १.५५ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
एक इसम काळ्या रंगाच्या शाईन मोटारसायकलवर गांजा वाहून भुसावळ शहरात येत असल्याची माहिती
स्थानिक गुन्हे शाखेचे गोपाल गव्हाळे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यापर्यंत पोहचवण्यात आली. त्यांच्या आदेशावरून पो.उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले.
सदर पथकाने भुसावळमधील हॉटेल सुरुची इनसमोरील नॅशनल हायवेवरील नागपूरकडे जाणाऱ्या वाहिनीवरील सर्व्हिस रोडवर सापळा लावला. दरम्यान, संशयास्पद काळ्या रंगाची शाईन मोटारसायकल घटनास्थळी दाखल झाली. पोलीसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी करून तपासणी केली असता त्याने आपले नाव अनारसिंग वालसिंग भिलाला (वय ३०, रा. शमलकोट, ता. झिरण्या, जि. खरगोन, मध्यप्रदेश) असे सांगितले.
त्याची तपासणी केली असता त्याच्याकडून सुमारे १०.२७५ किलो गांजा (किंमत ₹२,०५,५००), एक शाईन मोटारसायकल (₹७५,०००) आणि मोबाईल (₹१०,०००) असा एकूण ₹२,९०,५०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन करत आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक राहुल वाघ, सहा. पो.नि. नितीन पाटील यांच्या समन्वयाने स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली.

