“मंडे मंडे इम्पॅक्ट” नशिराबाद येथील कुंभार वाड्याजवळील रस्त्यामधील विहीर बुजविण्यासाठी नगरपरिषदेची तातडीची हालचाल, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | नशिराबाद येथील कुंभार वाड्याजवळील अर्धवट अवस्थेतील विहीर, त्यात झिरपणारे सांडपाणी आणि वाढलेला अपघाताचा धोका याबाबत मंडे टु मंडे न्युज ने बातमी प्रसिद्ध केली होती. या प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची (‘मंडे टू मंडे इफेक्ट’) दखल घेत नशिराबाद नगरपरिषदेने तातडीने हालचाल केली आहे. नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना पत्र पाठवून संबंधित विहीर तात्काळ बुजविण्याची मागणी केली आहे.
नगराध्यक्षांनी पाठवलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सदर विहीर ही गावातील मुख्य रस्त्यालगत असून अनेक वर्षांपासून वापरात नसलेली व धोकादायक अवस्थेत आहे. विहिरीत गटारीचे सांडपाणी झिरपत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या या विहिरीमुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना, विशेषतः लहान मुले व जनावरांना अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर “सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने सदर विहीर तातडीने बुजविणे अत्यावश्यक आहे,” असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाने विलंब न लावता योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाही स्वतंत्र निवेदने सादर केली आहेत. संबंधित विभागांनी तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या निवेदनांतून करण्यात आली आहे. “मंडे टु मंडे न्युज” मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर प्रशासन जागे झाले असून पुढील काही दिवसांत या समस्येवर ठोस निर्णय होण्याची अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
