नशिराबादचे ‘आर.ओ.’ प्लॅन्ट धूळ खात ; लाखोंचे साहित्य चोरीला की भंगारात? पाणीपुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे |
नशिराबाद शहरात शुद्ध पाणीपुरवठा मिळावा या साठी लाखो रुपये खर्चून उभारलेले आर.ओ. प्लॅन्ट सध्या प्रशासकीय अनास्थेचे बळी ठरत आहेत. तीनपैकी केवळ एक केंद्र दुरुस्त करून श्रेय लाटणाऱ्या नगरपरिषद प्रशासनाला उर्वरित दोन केंद्रांच्या साहित्याचा विसर पडला आहे का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. विशेषतः पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे सरकारी मालमत्तेचे नुकसान होत असल्याने त्यांच्या ‘कानउघाडणी’ची वेळ आल्याची चर्चा शहरात रंगत आहे.
यंत्रसामुग्रीची वाट लागली; जबाबदार कोण?
२०१६-१७ मध्ये १४ व्या वित्त आयोगातून बस स्थानकाजवळील वरची आळी आणि पाण्याच्या टाकीजवळ दोन मोठे आर.ओ. प्लॅन्ट बसवण्यात आले होते. मात्र, कोरोना काळापासून हे प्लांट्स बंद आहेत. सध्या या केंद्रांची अवस्था अत्यंत भीषण आहे. महागडे फिल्टर्स, टाक्या,मोटार, वीज उपकरणे आणि पाईप्स नेमके कुठे गेले? साहित्याची चोरी झाली की ते गंजून भंगारात गेले? याचा जाब विचारण्यासाठी पाणीपुरवठा विभागात कुणीही वाली उरलेला नाही.
फक्त एक केंद्र सुरू करून भागणार नाही! ‘खालची आळी’ येथील केंद्र सुरू झाल्याचे श्रेय घेणाऱ्या पाणीपुरवठा विभागाने उर्वरित दोन केंद्रांकडे पाठ का फिरवली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. उन्हाळा तीव्र होत असताना शहरातील इतर भागांतील नागरिकांनी पाण्यासाठी कुठे जायचे? नवीन प्लॅन्ट उभारण्याच्या घोषणा करण्यापेक्षा, जुन्या प्लॅन्टमधील लाखो रुपयांच्या साहित्याचे काय झाले, याचे उत्तर आधी जनतेला द्यावे, अशी मागणी होत आहे.
प्रशासकीय निष्काळजीपणाचा कळस
नगरपरिषदेची निर्मिती झाल्यानंतर या मालमत्तेचे हस्तांतरण आणि देखरेख करणे ही विभागाची जबाबदारी होती. मात्र, देखभालीअभावी हे प्लांट्स आता मोडकळीस आले आहेत. जर या साहित्याचे नुकसान झाले असेल, तर त्याची वसुली जबाबदार अधिकाऱ्यांकडून किंवा लोकप्रतिनिधींकडून का केली जाऊ नये? अशा संतप्त प्रतिक्रिया नशिराबादकरांमधून उमटत आहेत.
नागरिकांचा इशारा
शहरातील बंद असलेले दोन्ही प्लॅन्ट तातडीने दुरुस्त करून सुरू न झाल्यास आणि गायब झालेल्या साहित्याचा हिशोब न मिळाल्यास, पाणीपुरवठा विभागावर जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. पाणीपुरवठा सभापती यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.आता पाणीपुरवठा सभापती यावर काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
