पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीला मांत्रिकाचा सव्वा कोटींचा गंडा ; ‘काळी जादू’च्या भीतीने ९ वर्षे उकळले पैसे
नवी मुंबई.मंडे टु मंडे न्युज | घरावर काळी जादू झाली असून कुटुंबाच्या जीविताला धोका असल्याची भीती दाखवत उत्तर प्रदेशातील मांत्रिक दाम्पत्याने मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीची तब्बल १ कोटी २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल नऊ वर्षे पूजा-विधी, मंत्र-तंत्र आणि करणी दूर करण्याच्या नावाखाली महिलेकडून पैसे उकळण्यात आले. या प्रकरणी रहीशमिया आणि अस्मा रहीशमिया यांच्याविरोधात एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
तक्रारदार महिला आपल्या पती आणि मुलीसह सीवूड परिसरात राहतात. सुमारे दहा वर्षांपूर्वी घरात सुखशांती नसल्याने त्या विविध धार्मिक विधी करत होत्या. याच काळात जालन्यातील एका बाबाने त्यांच्या घरावर मोठे संकट असल्याचे सांगत उत्तर प्रदेशातील एका मांत्रिकाचा संपर्क क्रमांक दिला.
काळी जादू झाल्याची भीती दाखवली
उत्तर प्रदेशातील मांत्रिकाने महिलेशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्या मनात घरावर करणी आणि काळी जादू झाल्याची भीती निर्माण केली. कुटुंबावर मोठे संकट असून ते दूर करण्यासाठी विशेष पूजा, विधी आणि मंत्र-तंत्र करावे लागतील, असे सांगण्यात आले.
यानंतर विविध पूजा-विधी करण्याच्या नावाखाली महिलेकडून वेळोवेळी पैसे घेतले गेले. आरोपींनी ऑनलाइन पद्धतीनेही काही विधी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच एकदा आरोपी सीवूड येथील महिलेच्या घरी येऊन पूजा केल्याचेही पोलिस तक्रारीत म्हटले आहे.
नऊ वर्षे पतीपासून लपवला प्रकार
तक्रारदार महिलेचे पती मुंबई पोलिस दलात वरिष्ठ पोलिस निरीक्षक असल्याने त्यांनी तब्बल नऊ वर्षे हा प्रकार पतीपासून लपवून ठेवला. मात्र, काही दिवसांपासून पत्नीच्या वाढत्या खर्चाबाबत पतीला संशय आला. त्यांनी याबाबत चौकशी केल्यानंतर मांत्रिक दाम्पत्याकडून सुरू असलेल्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेत संपूर्ण प्रकार सांगितला. पूजा-विधी, मंत्र-तंत्र आणि करणी दूर करण्याच्या नावाखाली आरोपींनी तब्बल १ कोटी २२ लाख रुपये घेतल्याचे समोर आले
या प्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात रहीशमिया आणि अस्मा रहीशमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू असून या फसवणुकीमागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही पोलिस तपास करत आहेत.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

