लॉज वर पोलिसांचा छापा, वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, व्यवस्थापक व दलालांना अटक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव शहरात एक मोठी कारवाई करण्यात आली असून मध्यवर्ती आणि वर्दळीचे ठिकाण असलेल्या जळगाव शहरातील टॉवर चौक परिसरातील एका नामांकित लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला आहे. या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
टॉवर चौक परिसरातील एका नामांकित लॉजवर काही महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून बेकायदेशीररीत्या वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.या माहितीचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एलसीबी आणि एचटीयू च्या अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.
असा रचला ‘डमी’ ग्राहकाद्वारे सापळा
या कारवाईसाठी पोलिसांनी गोपनीय नियोजन करून
माहितीची खात्री करण्यासाठी प्रथम एका ‘डमी’ ग्राहकाला संबंधित लॉजवर पाठवले. तिथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री होताच, डमी ग्राहकाने इशारा केला. इशारा मिळताच दबा धरून बसलेल्या एलसीबी आणि एचटीयूच्या पथकाने लॉजवर झडप घातली.
या छाप्यात देहविक्रय रॅकेट रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिसांनी या व्यवसायात गुंतलेल्या लॉजचा व्यवस्थापक आणि दलालांना (एजंट) तात्काळ ताब्यात घेतले आहे. तसेच, या रॅकेटमध्ये अडकलेल्या पीडित महिलांची पोलिसांकडून सुटका करण्यात आली असून, त्यांचे समुपदेशन करून त्यांना सुधारगृहात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

