जळगावला ‘रेड अलर्ट’; पुढील २४ ते ४८ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा, प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन
जळगाव | मंडे टू मंडे न्यूज | भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, पुढील २४ ते ४८ तासांत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. काही भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नदी, नाले, पूल, धबधबे तसेच पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नाशिक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर नंदुरबार जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून, काही भागांत अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, बचाव साहित्य आणि मनुष्यबळ सज्ज ठेवण्याचे आदेश दिले असून, पूरप्रवण क्षेत्रे, धरणे, नदीकाठ आणि नाल्यांवर विशेष लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. तसेच वीज, पाणीपुरवठा, आरोग्य, पोलीस, महसूल, ग्रामपंचायत आणि नगरपालिका यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
नागरिकांनी विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली उभे राहू नये, तसेच मोकळ्या मैदानात जाणे टाळावे. हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास टोल फ्री क्रमांक 1077, जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्ष 0257-2217193 / 0257-2223180 किंवा WhatsApp हेल्पलाईन 9373789064 वर संपर्क साधावा, असे प्रशासनाने कळविले आहे.


