फळपिक विम्याचा शेतकऱ्यांना दिलासा; हेक्टरी ८५ हजारांपर्यंत भरपाई मंजूर, आ.चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
मुक्ताईनगर, रावेर व बोदवड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच रक्कम जमा होणार
मुक्ताईनगर.मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके || आंबिया बहार फळपिक विमा योजना २०२५-२६ अंतर्गत अति अधिक व कमी तापमानामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना महसूल मंडळनिहाय हेक्टरी फळपिक विमा मंजूर झाला आहे. मतदारसंघातील शेतकऱ्यांना फळपिक विम्याचा लाभ मिळावा, यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली महसूल मंडळात केळी पिकासाठी हेक्टरी ८५ हजार रुपये, घोडसगाव व कुऱ्हा महसूल मंडळात केळीसाठी ७४ हजार ६७९ रुपये मंजूर झाले आहेत. कुऱ्हा मंडळातील संत्रा पिकासाठी हेक्टरी ५० हजार रुपये, तर निमखेडी बुद्रुक महसूल मंडळातील केळी पिकासाठी हेक्टरी ७४ हजार ६७९ रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
रावेर तालुक्यातील ऐनपूर व खिर्डी महसूल मंडळात केळी पिकासाठी हेक्टरी ८५ हजार रुपये, सावदा मंडळात ५२ हजार ८२१ रुपये, तर निंभोरा महसूल मंडळात केळी पिकासाठी हेक्टरी ८५ हजार रुपये मंजूर झाले आहेत.
बोदवड तालुक्यातील बोदवड, साळशिंगी व शेलवड महसूल मंडळात केळी पिकासाठी हेक्टरी ७४ हजार ६७९ रुपये विमा मंजूर झाला आहे.
अति अधिक व कमी तापमानामुळे फळपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या मंजुरीमुळे मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत विमा रकमेचे वितरण सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याबद्दल शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

