महाराष्ट्रात खळबळ! मुंबई पोलीस दलात ६.५ कोटींचा वेतन घोटाळा ; बोगस पोलिसांच्या नावावर सरकारी तिजोरीला गंडा
मुंबई.मंडे टु मंडे न्युज || गुन्हे आणि घोटाळ्यांचा नेहमीच पर्दाफाश करणाऱ्या मुंबई पोलीस दलातच तब्बल ₹६.५ कोटींचा वेतन घोटाळा उघडकीस आल्याने पोलिस दलासह राज्यभर खळबळ उडाली आहे. बोगस पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावावर बनावट नोंदी करून शासनाकडून कोट्यवधी रुपयांचे वेतन उचलल्याप्रकरणी पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध समतानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांच्या वेतनाचा डेटा जुन्या ‘सेवार्थ’ प्रणालीतून नव्या प्रणालीत स्थलांतरित करताना हा घोटाळा उघड झाला. उत्तर प्रादेशिक विभाग कार्यालयातील वेतन प्रक्रियेदरम्यान पोलिस दलात नसलेल्या ८ ते १० बोगस व्यक्तींना पोलीस कर्मचारी दाखवून त्यांच्या नावावर बँक खाती उघडण्यात आली. त्यानंतर या खात्यांमध्ये शासनाकडून नियमित वेतन जमा करून कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाची शंका आल्याने २०१९ आणि २०२० या दोन वर्षांचे विशेष लेखापरीक्षण करण्यात आले. ऑडिटमध्ये वेतनाच्या रकमेत मोठी तफावत आढळून आली. तपासादरम्यान ज्या व्यक्तींच्या खात्यात पगार जमा झाला, त्या प्रत्यक्षात पोलीस दलात कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले. तक्रारीनुसार, रामदास भोगले, सुधाकर कदम, सरजू यादव, भगवत भोसले, गुणाजी खावकर, महादेव हलदणकर, राजेंद्र सोनार, उत्तम थोरात, सूर्यकांत पाटील आणि पांडुरंग कदम या नावांवरून वेतन काढण्यात आले. हे लोक नेमके कोण आहेत, त्यांचे संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांशी काय संबंध आहेत आणि या घोटाळ्याचे सूत्रधार कोण आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.


