नशिराबाद बोगदा परिसरातील सर्व्हिस रोड जलमय ; नागरिकांमध्ये तीव्र संताप
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ . दीपक लोखंडे | नशिराबाद येथील पोलिस स्टेशन रोडलगत असलेल्या बोगद्याजवळील सर्व्हिस रोडवर अवकाळी वादळी पावसामुळे गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांसह वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे ही समस्या अनेक वर्षांपासून कायम असून ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
भुसावळ–जळगाव मार्गावरील हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असून परिसरात पेट्रोल पंप, शाळा तसेच विविध आस्थापना असल्याने विद्यार्थी, कर्मचारी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीवर गंभीर परिणाम होत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे.अवकाळी पावसातच ही परिस्थिती निर्माण होत असल्याने नियमित पावसाळा सुरू झाल्यानंतर परिस्थिती किती गंभीर होईल, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. पावसाळ्यात ही समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
रस्त्याच्या बांधकामावेळी गटारीचा योग्य मार्ग व पाण्याचा उतार न दिल्यामुळे पावसाचे पाणी साचत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच गटारी पूर्णपणे बंदिस्त नसल्याने पाण्याखाली गटारीचा अंदाज न आल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. याशिवाय अतिक्रमण न हटवता रस्ता अरुंद स्वरूपात बांधण्यात आल्याने वाहतुकीच्या समस्या अधिकच वाढल्या आहेत.
वाढती लोकसंख्या आणि वाढलेली रहदारी लक्षात घेता हा रस्ता अपुरा पडत आहे. समोरासमोर दोन मोठी वाहने आल्यास वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून वाहनचालकांमध्ये वाद होण्याच्या घटनाही घडत आहेत. या मार्गावरून एसटी महामंडळाच्या बसेसही धावत असल्या तरी रस्त्याची अरुंदता आणि पाणी साचण्याच्या समस्येमुळे अनेक बसचालक उड्डाणपुलावरील पर्यायी मार्गाचा वापर करण्यास प्राधान्य देत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या सर्व परिस्थितीमुळे प्रवासी, कामगार आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन सर्व्हिस रोडवरील पाणी साचण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.


