ब्रेकिंग : सेक्स रॅकेट छाप्यात पकडलेली महिला “बांगलादेशी”, जळगाव जिल्ह्यात खळबळ
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव शहरातील निमखेडी रस्त्यावरील ब्रम्हांडनायक अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या कथित कुंटणखान्यावर टाकलेल्या छाप्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पोलिसांच्या सतर्क तपासामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील घुसखोरी आणि बनावट कागदपत्रांच्या रॅकेटकडे संशयाची सुई वळली आहे.
जळगाव तालुका पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत दाखल गुन्ह्याच्या तपासात धक्कादायक माहिती उघड करत एका बांगलादेशी महिलेचा शोध लावला आहे.
जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने २१ मे रोजी निमखेडी रोड परिसरातील ब्रम्हांडनायक अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या कथित कुंटणखान्यावर छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान सागर सोनवणे (रा. धरणगाव) आणि सीमा उर्फ कविता मोरे (रा. जळगाव) यांच्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. कारवाईदरम्यान दोन महिलांची सुटका करून त्यांना संरक्षणासाठी आशादीप संस्थेत दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान संबंधित महिलांची चौकशी करण्यात आली असता, त्यापैकी एका महिलेच्या हालचाली, भाषाशैली आणि कागदपत्रांबाबत पोलिसांना संशय आला. सुरुवातीला सदर महिला स्वतःची खरी ओळख लपवण्याचा प्रयत्न करत होती. चौकशीदरम्यान ती सातत्याने दिशाभूल करणारी माहिती देत असल्याने पोलिसांनी अधिक बारकाईने तपास सुरू केला.
पोलिसांनी संबंधित महिलेचा मोबाईल फोन तपासला असता त्यामध्ये काही संशयास्पद संपर्क, परदेशी क्रमांक तसेच वेगवेगळ्या नावांनी सेव्ह केलेली माहिती आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या कागदपत्रांची बायोमेट्रिक पडताळणी केली. या पडताळणीत तिच्याकडे असलेले आधार कार्ड बनावट असल्याचे स्पष्ट झाले. पुढील चौकशीत संबंधित महिलेचे नाव जाकिया अबुल काहेर फोकर (२८) असून ती मूळची बांगलादेशातील खुलना येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. या उघडकीनंतर पोलिसांनी संपूर्ण तपासाची दिशा बदलली. ही महिला भारतात कोणत्या मार्गाने आली, तिला बनावट आधार कार्ड कोणी तयार करून दिले, तसेच ती किती दिवसांपासून महाराष्ट्रात वास्तव्यास होती याचा तपास सुरू करण्यात येत आहे. याशिवाय तिचा मानवी तस्करी, बनावट कागदपत्र रॅकेट किंवा अन्य गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आहे, का याचाही शोध घेतला जात आहे.
तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला काही काळापासून वेगवेगळ्या शहरांमध्ये राहत होती किंवा तिने स्थानिक ओळखपत्रांचा वापर करून स्वतःची ओळख लपवली होती का, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून आता तिच्या मोबाईलमधील तांत्रिक माहिती, कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया अकाउंट्स तसेच आर्थिक व्यवहारांचीही तपासणी केली जात आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, बांगलादेशी नागरिकांच्या बेकायदेशीर वास्तव्या संदर्भातील प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात बनावट कागदपत्रांचा वापर, बेकायदेशीर वास्तव्यासह इतर गंभीर कलमांनुसार पुढील कारवाई सुरू केली असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. अशाच प्रकारे काही वर्षांपूर्वी जळगावसह भुसावळ शहरात दोन बांगलादेशी महिला आढळल्या होत्या.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान थेट आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि बनावट भारतीय ओळखपत्राचे रॅकेट समोर आल्याने जळगाव पोलिसांचे हे मोठे यश मानले जात आहे. ही बांगलादेशी महिला भारतात आणि विशेषतः जळगावात कधी व कोणाच्या मदतीने आली? यामागे मानवी तस्करी करणारी मोठी टोळी सक्रिय आहे का? याबाबत जळगाव तालुका पोलीस आता पुढील सखोल तपास करत आहेत.

