भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

ट्रॅक्टर रोटर मध्ये अडकून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, यावल तालुक्यातील घटना

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यातील मोहराळे शिवारातील शेतात ट्रॅक्टारने रोटावेटर करत असताना दहिगाव येथील २७ वर्षीय शेतकऱ्याचा अचानक तोल जावून ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडून रोटावेटरमध्ये अडकून जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार दि.२३ रोजी दुपारी घडली. विशेष म्हणजे तरुणाचे १८ जून रोजी लग्न पार पडणार होते, त्याआधीच त्याच्यावर काळाने घाला घातला. याबाबत यावल पोलिसात नोंद करण्यात आली आहे. योगेश यशवंत पाटील (वय २७, रा. दहिगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार दि. २३ रोजी दुपारी योगेश पाटील हे बबलू उर्फ शोभराज रमेश महाजन यांच्या मोहराळे शिवारातील शेतात ट्रॅक्टरद्वारे रोटावेटरचे काम करत होते. याच वेळी त्यांचा अचानक तोल जाऊन ते ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडले आणि रोटावेटरमध्ये अडकून गंभीर जखमी होऊन

जागीच मृत्युमुखी पडले. अपघातावेळी ट्रॅक्टर सुरूच असल्याने ते नियंत्रणाविना पुढे सरकत शेजारील शेतात गेले. हे दृश्य शेजारील शेतात बसलेल्या एका तरुणाने पाहिले आणि धाव घेऊन ट्रॅक्टर बंद केला. त्यानंतर त्याने तात्काळ घटनेची माहिती मयताच्या वडिलांना दिली. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत योगेश यांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नियतीने अचानक घातलेल्या या घाल्यामुळे कुटुंबावर आणि गावावर शोककळा पसरली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वसीम तडवी व सहकारी करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!