स्मार्ट मीटरचा झटका, २ हजाराचे बिल २८ हजारावर, वीज बिल भरण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | अदानी कंपनीच्या स्मार्ट मीटरने ग्राहकांना चांगलाच झटका दिला आहे. ‘कासा-युनो’ या डोंबिवलीतील आलिशान टाऊनशिप असलेल्या लोढा पलावा टाऊनशिप मधील सोसायटीतील सदनिकाधारकांना आधी दोन ते अडीच हजार येणारे बिल स्मार्ट मीटर बसवल्यानंतर २० ते २८ हजार येत आहे. प्रत्येक महिन्याला येणारी बिले पाहून शेकडो रहिवाशांवर अक्षरशः वीज कोसळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गृहकर्जाच्या ईएमआयपेक्षाही वीज बिल अधिक असून बिल भरण्यासाठीही कर्ज काढण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे.
महावितरण जादा बिले येत असल्याची तक्रार करूनही दाद देत नसल्याने रहिवासी घरे विकून जाण्याच्या तयारीत आहेत.तर भाडेकरू कितीतरी पटीने जास्त वीज बिल येत असल्याने घर सोडण्याच्या तयारीत आहे. या सोसायटीमध्ये सुमारे ७६० रहिवासी वास्तव्यास आहेत. त्यातील सुमारे ३०० हून अधिक रहिवाशांना महावितरण कंपनीच्या टीओडी स्मार्ट मीटर बसवल्याने त्रासदायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
या सोसायटीत पूर्वी महावितरणचे साधे मीटर होते. तेव्हा त्यांना योग्य प्रकारे बिल येत होते. मात्र स्मार्ट मीटरच्या बिघाडामुळे दोन ते तीन हजारांचे बिल थेट २० ते २८ हजार इतके येत आहे. ‘कासा युनो’ सोसायटी मधील सुमारे ३०० रहिवाशांना मागील महिन्याचे वीज मासिक भाड्यापेक्षा जास्त किंवा त्यांच्या गृहकर्जाच्या हप्त्यापेक्षा जास्त आले आहे. त्यामुळे वीज बिल भरण्यासाठीही कर्ज घेण्याची वेळ काही रहिवाशांवर आली आहे. काही घरमालक मुंबई, पुणे, बंगळुरू तसेच परदेशात राहायला आहेत. त्यांनी सदनिका भाड्याने दिल्या आहेत. त्यांचे भाडे दहा ते पंधरा हजार आहे. मात्र भाडेकरूंना घर भाड्यापेक्षा अधिक वीज बिल येत असल्याने त्यांनी पलावामधील घरे सोडून दुसरीकडे राहायला जाणे पसंद केले आहे.
रीडिंग शून्य तरी वीज बिल मात्र ११ हजार
न्युझीलंडमध्ये राहत असलेले विनयकुमार जयस्वाल यांचा पलावा येथील ‘कासा युनो’ मधील फ्लॅट गेल्या पाच वर्षांपासून बंद आहे. मार्चपर्यंत त्यांना सेवा शुल्क आणि किमान वापर म्हणून ३०० ते ४०० रुपये मासिक बिल महावितरणकडून येत होते. परंतु जेव्हापासून स्मार्ट मीटर बसवले तेव्हापासून त्यांना मीटरमध्ये शून्य रीडिंग दिसत असतानाही जून महिन्याचे ११ हजार रुपये बिल आले आहे. त्यामुळे बंद घराला इतके बिल येत असल्याने महावितरणच्या भोंगळ कारभाराचे उत्तम उदाहरण यापेक्षा दुसरे कोणते असू शकते, असा संताप जयस्वाल यांनी केला. मे महिन्यात आम्ही उन्हाळी सुट्टीसाठी संपूर्ण महिना बाहेर गावी होतो. तरीही आम्हाला मे महिन्याचे बिल १० हजारांपेक्षा जास्त आले आहे, असे पलावा सिटीतील अनेक रहिवाशांनी सांगितले. जुन्या मीटरचे रूपांतर स्मार्ट मीटर मध्ये झाल्याने ही वाढीव बिले येत आहेत. अशा तक्रारी वीज ग्राहक करीत आहेत.

