भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

पाणी प्रश्न सोडवा अन्यथा हंडा मोर्चा काढणार; सावदा पालिकेवर नागरिकांची पाण्यासाठी धडक !

सावदा, मंडे टू मंडे न्यूज नेटवर्क | शहरातील प्रभाग क्रमांक ५ अंतर्गत येणाऱ्या जगमाता परिसरात मागील तीन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने परिसरातील नागरिक व महिलांमध्ये तीव्र संतापाची व्यक्त करत नगरपालिवर मोर्चा काढण्यात आला.

यासंदर्भात नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना लिहलेल्या निवेदनात परिसरातील गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. निवेदनानुसार, अनेक कुटुंबांना नियमित पाणी मिळत नसल्यामुळे महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, परिसरातील काही भागांमध्ये पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्यामुळे अनेक घरांपर्यंत पाणी पोहोचतच नाही. विशेषतः मोटारधारक नागरिकांकडे पाणी वळवले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून सामान्य नागरिकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

नागरिकांनी प्रशासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत :

जगमाता परिसरात नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पारदर्शकपणे जाहीर करावे. परिसरात अतिरिक्त पाणीपुरवठ्याची तातडीने व्यवस्था करावी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी

दरम्यान, “आम्हाला फक्त आश्वासने नकोत, पाणी हवे आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली. जर तातडीने उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर नगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

सावदा नगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहते, याकडे संपूर्ण पंचक्रोशीचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!