भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

गुटखा तस्करांमध्ये खळबळ, २९ लाखांचा गुटखा जप्त

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमे अंतर्गत एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला तब्बल २८ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा गुटखा आणि पानमसाल्याचा साठा जप्त केला. या कारवाईत मालवाहू बोलेरो वाहनासह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने गुटखा तस्कर व विक्रेत्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात अवैध व्यावसायिकां विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्या नुसार जळगाव शहरातील महामार्गावरून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना ९ जून रोजी मिळाली होती. त्या नुसार विशेष पथक तयार करून कारवाईचे आदेश देण्यात आले.

पथकाने अजिंठा चौक ते इच्छादेवी चौक दरम्यानच्या महामार्गावरील जिओ पेट्रोलपंप परिसरात सापळा रचला. मिळालेल्या माहितीच्या आधारे बोलेरो मालवाहू वाहन क्रमांक
MH-19 CX-3280 तेथे आल्यानंतर पोलिसांनी अडवून वाहन चालकाकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीत वाहनाच्या मागील भागात महाराष्ट्र राज्यात विक्री, साठवणूक आणि वाहतुकीस प्रतिबंधित असलेल्या विमल सुगंधित गुटखा आणि पानमसाल्याचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून पंचनामा केला. चौकशीत चालकाने आपले नाव जोगेंद्र भिका पाटील (रा. फुलपाट, ता. धरणगाव) असे सांगितले. कारवाईदरम्यान २१ लाख ८१ हजार ६०० रुपये किमतीच्या प्रतिबंधित विमल गुटखा व पानमसाल्याच्या ५८ गोण्या तसेच ७ लाख रुपये किमतीचे महिंद्रा बोलेरो मालवाहू वाहन (क्रमांक MH-19 CX-3280) असा एकूण २८ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे व त्यांच्या पथकाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!