साडेपाच हजार वर्षांचा इतिहास असलेले यावलचे पुरातन श्री महर्षी व्यास मंदिर ; गुरुपौर्णिमेनिमित्त जाणून घ्या प्राचीन अख्यायिका..
यावल | मंडे टु मंडे न्युज | आषाढ महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. हिंदू धर्मात हा दिवस आदिगुरू महर्षी वेदव्यास यांच्या जन्मदिनानिमित्त व्यास पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो. महाभारत, श्रीमद्भागवत, ब्रह्मसूत्र, मीमांसा तसेच अठरा पुराणांचे रचनाकार म्हणून महर्षी वेदव्यास यांना भारतीय संस्कृतीत सर्वोच्च स्थान प्राप्त आहे.
जळगाव जिल्ह्यातील यावल येथे महर्षी व्यास यांचे अत्यंत पुरातन व ऐतिहासिक मंदिर आहे. पुराणात सांगितल्यानुसार यावल ही महर्षी व्यास मुनींची साधनाभूमी मानली जाते. येथे महर्षी व्यासांचे प्राचीन मंदिर असुन या स्थानाला हजारो वर्षांचा धार्मिक इतिहास लाभला आहे.
महर्षी व्यासांनी महाभारताची रचना व वेदांचे वर्गीकरण याच परिसरात केले अशी भाविकांची श्रद्धा आहे. दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेला (व्यास पौर्णिमा) येथे मोठी यात्रा भरते आणि वारकरी मंडळी मोठ्या संख्येने येतात. जळगाव जिल्ह्यासाठी हे एक प्रमुख धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळ मानले जाते.
देशभरात महर्षी व्यास यांची केवळ तीनच प्रमुख मंदिरे असल्याचे मानले जाते. त्यापैकी पहिले बद्रिकारण्यातील व्यासचट्टी, दुसरे वाराणसीजवळील रामनगर आणि तिसरे जळगाव जिल्ह्यातील यावल येथे आहे. यावलमधील हे मंदिर तब्बल साडेपाच हजार वर्षे जुने असल्याची श्रद्धा असून त्यामागे अनेक पौराणिक आख्यायिका सांगितल्या जातात.
व्यास ऋषींच्या वडिलांचे नाव पराशर ऋषी होते. त्यांच्या आईचे नाव सत्यवती होते. (जिला ‘मत्स्यगंधा’ असेही म्हटले जाई) त्या कोळी समाजातील कन्या होत्या आणि त्यांचे वडील एका यमुना तीरावरील नौका चालवणाऱ्या कोळी प्रमुखाच्या अधिपत्याखाली होते. यमुना नदीमधील एका बेटावर महर्षी पराशर व सत्यवती यांचे पासून व्यासांचा जन्म झाला. त्यामुळे त्यांना ‘कृष्णद्वैपायन’ (कृष्ण = सावळा वर्ण, द्वैपायन = बेटावर जन्मलेला) असेही म्हणतात.
स्कंद पुराणानुसार, व्यासांनी वाटिका, जिला पिंजला म्हणूनही ओळखले जाते , तिच्याशी विवाह केला, जी जाबाली नावाच्या ऋषींची कन्या होती. असे वर्णन केले आहे की व्यासांना झालेला वारस जो निर्माण झाला, तो ऐकलेली प्रत्येक गोष्ट पुन्हा सांगत असे, त्यामुळे त्याला शुक (शब्दशः) हे नाव मिळाले.
गुरु ब्रह्मा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरः।
गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः॥
या सुप्रसिद्ध श्लोकानुसार गुरु हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप मानले गेले असून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंना सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेला गुरुपूजनासह महर्षी व्यासांची विशेष पूजा केली जाते.
महाभारताची काही पर्वे यावलमध्ये लिहिल्याची आख्यायिका
सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी तापी खोऱ्यात वसलेले यावल हे महर्षी व्यासांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध असल्याचे मानले जाते. आख्यायिकेनुसार, महर्षी व्यास यांनी काही काळ यावल येथे वास्तव्यास राहून महाभारतातील काही पर्वांची रचना याच भूमीत केली.
पूर्वी हडकाई-खडकाई या नद्यांना हरीता आणि सरीता अशी नावे होती. या नद्यांच्या संगमानंतर वाहणाऱ्या दक्षिणवाहिनी सुर नदीच्या काठी लोमेश ऋषींचा आश्रम होता. येथे आयोजित यज्ञासाठी लोमेश ऋषींनी महर्षी व्यासांना आमंत्रित केले होते.
याच काळात अज्ञातवास संपवून हस्तिनापूराकडे परतणारे पांडव लोमेश ऋषींच्या आश्रमात आले. त्यांच्या उपस्थितीत महर्षी व्यासांच्या हस्ते यज्ञ संपन्न झाला. यज्ञानंतर महर्षींनी काही काळ यावलमध्ये वास्तव्य करून महाभारतातील काही पर्वांची रचना केल्याची लोकश्रद्धा आजही प्रचलित आहे.
महर्षी व्यास हे सप्त चिरंजीवींपैकी एक मानले जातात. त्यामुळे ते आजही या भूमीत अदृश्य स्वरूपात वावरत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. वेदांमध्येही या स्थानाचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे यावलचे श्री व्यास मंदिर धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त येथे हजारो भाविक दर्शनासाठी आणि गुरुपूजनासाठी गर्दी करतात.
यंदाची गुरुपौर्णिमा
वैदिक पंचांगानुसार, यंदा गुरुपौर्णिमा बुधवार, 29 जुलै 2026 रोजी साजरी होणार आहे. पौर्णिमा तिथीची सुरुवात 28 जुलै रोजी सायंकाळी 6:19 वाजता होईल, तर तिथीची समाप्ती 29 जुलै रोजी रात्री 8:06 वाजता होईल. या कालावधीत गुरुपूजन, दानधर्म आणि धार्मिक विधी करणे अत्यंत शुभ मानले जाते. गुरुपौर्णिमा हा केवळ धार्मिक उत्सव नसून, आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या आशीर्वादाचे स्मरण करण्याचा पवित्र दिवस आहे.


