तक्रार देणाराच निघाला महाठग : जळगाव जिल्ह्यातील तब्बल २७९ जणांना लावला २३ कोटींचा चुना
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शेअर मार्केटच्या नावाखाली मोठे आमिष दाखवून जळगाव जिल्ह्यातील २७९ जणांना तब्बल २३ कोटी ८१ लाख ७२ हजार ५३० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे ज्याने तक्रार केली त्या ‘TWJ असोसिएट्स’ या कंपनीच्या मास्टरमाईंड’ असलेल्या मिलिंद शालिकराव पाटील याचा आर्थिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. हाच ‘मास्टरमाईंड’ आणि कमिशन एजंट असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
मुख्य कार्यालय पुणे येथे असलेल्या ‘TWJ असोसिएट्स प्रा.लि.’ आणि ‘TWJ इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपन्यांनी डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२५ या काळात जळगाव शहरासह जिल्ह्यात आपले जाळे पसरवले होते. कंपनीचे मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर आणि नेहा समीर नार्वेकर यांनी स्थानिक हस्तक मिलिंद पाटील याच्या माध्यमातून जागोजागी सेमिनार आयोजित केले. “आमच्याकडे गुंतवणूक करा आणि दरमहा बक्कळ परतावा मिळवा,” असे स्वप्न दाखवून सामान्य लोकांची दिशाभूल करण्यात आली. गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारून त्यांना बनावट करारनामे करून दिले होते. तसेच सेबीच्या (SEBI) नियमांची पायमल्ली करत ११ महिने मुदतीचे बेकायदेशीर ‘डिपॉझिट’ स्किम्स राबवून कोट्यवधी रुपये उकळण्यात आले. नार्वेकर दाम्पत्यावर राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
सुरुवातीला स्थानिक ‘मास्टरमाईंड’ असलेल्या मिलिंद शालिकराव पाटील याने आपणही फसवणूक झाल्याचे भासवून पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेने जेव्हा या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता धक्कादायक वास्तव चौकशीतून समोर आले. मिलिंद पाटील हा केवळ गुंतवणूकदार नव्हता, तर तो जळगाव शाखेचा ‘फ्रेंचायझी’ चालक होता. त्याने गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारून त्यांना बनावट करारनामे करून दिले होते. आणि त्या बदल्यात स्वतः कोट्यवधींचे कमिशन लाटले होते.
अखेर भरत रतीलाल पवार (रा. पाळधी) यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मिलिंद पाटीलला अटक करण्यात आली आहे. याचे कारनामे केवळ जळगावपुरते मर्यादित नाहीत. समीर आणि नेहा नार्वेकर या दांपत्यावर यवतमाळ, चिपळूण, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, रायगड आणि छत्रपती संभाजी नगर अशा विविध शहरांमध्ये गुन्हे दाखल आहेत. ठाणे पोलिसांनी यापूर्वीच त्यांना अटक केली असून सध्या ते नागपूर पोलिसांच्या ताब्यात असून लवकरच जळगाव पोलीस त्यांचा ताबा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून असे आवाहन करण्यात आले आहे की, TWJ’ कंपनीत ज्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे, त्यांनी त्वरित आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव येथे संपर्क साधावा.
सदरची कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश फड, रवींद्र परदेशी, विकास पहुरकर यांच्या पथकाने केली.

