नशिराबादच्या महालक्ष्मी – भादली स्टेशन रोड चौफुली ठरतेय जीवघेणी ; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला
पंधरा दिवसांत अनेक अपघात | ‘NHAI’ मोठ्या अपघाताची वाट बघतेय का? ग्रामस्थांचा संतप्त सवाल
नशिराबाद,मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | येथील महालक्ष्मी – भादली स्टेशन रोड चौफुलीजवळ आठवडा भरातील दुसरा अपघात झाला. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पुन्हा एकदा आयशर (MH 09 CA 0680), कार (MH 19 EG 6653) व दुचाकी या तीन वाहनांचा भीषण अपघात झाला असून, यात काही प्रवासी जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, महामार्ग सुरू होऊन अवघे काही वर्षांचा कालावधी उलटला असतानाही या अत्यंत धोकादायक ठरणाऱ्या चौफुलीवर साध्या पथदिव्यांची सोय करण्यात आलेली नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) या अक्षम्य डोळेझाक कारभारामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अंधार ठरतोय जीवघेणा
गेल्या काही दिवसात या चौफुलीवर अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.संध्याकाळच्या वेळी वयस्कर तसेच महिला वर्ग फेरफटका मारण्यासाठी आलेले असतात. रात्रीच्या वेळी या ठिकाणी प्रचंड अंधार असतो. महालक्ष्मी मंदिराकडे वळताना किंवा नशिराबादकडून भादलीकडे जाताना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. सर्विस रोड वर गतिरोधक नसल्याने जळगाव-भुसावळ महामार्गावरून सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांना ही चौफुली अंधाराचे साम्राज्य असल्याने नेमकी कुठे आहे, हेच समजत नाही. त्यामुळे लवकरात लवकर या चौफुलीवर हायमस्ट लॅम्प लावणे गरजेचे आहे.परिणामी, वळण घेणारी वाहने आणि सरळ जाणारी वाहने यांच्यात जोरदार धडक होत आहे.
ना गतिरोधक, ना हायमस्ट लॅम्प
चौफुली अत्यंत धोकादायक वळणावर असतानाही या ठिकाणी ना मोठ्या हायमस्ट दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. महामार्ग प्राधिकरणाने या गंभीर समस्येकडे सोयीस्कर रित्या डोळेझाक करून दुर्लक्ष केले असून, अपघातात होणाऱ्या जीवितहानीला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आज झालेल्या तीन वाहनांच्या अपघाताने या समस्येची भीषणता पुन्हा एकदा समोर आणली आहे.
प्रशासनाच्या दिरंगाईवर संताप
“या ठिकाणी हायमस्ट लॅम्प लावण्यासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासन सुस्तावलेल्या अवस्थेत का? प्राधिकरण काय कोणाचे बळी जाण्याची वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांकडून विचारला जात आहे. जर तातडीने या ठिकाणी उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
