आज होणार अकरावी ची दुसरी प्रवेश यादी प्रसिद्ध
कुंभारखेडा. ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज (प्रा योगेश कोष्टी) – इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने राबविली जात आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जुलैअखेर वाट पाहावी लागणार असून ११ ऑगस्टपासून अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होणार आहेत.
राज्यातील २१ लाख विद्यार्थ्यांपैकी पाच लाख १३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. आता मागील तीन दिवसांत पावणेतीन लाख विद्यार्थ्यांनी अर्धवट माहिती भरून व पसंतीक्रम बदलून त्यांचे अर्ज लॉक केले आहेत. १७ जुलैला या विद्यार्थ्यांची दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर चार दिवसांत सर्वांना प्रवेश घ्यावे लागणार आहेत. २३ जुलैला रिक्तपदांची माहिती जाहीर करून पाचव्या दिवशी (२८ जुलै) तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी चार दिवसांचा कालावधी दिला जाणार असून पुढे आवश्यकता भासल्यास चौथी गुणवत्ता यादी देखील जाहीर होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अकरावीच्या विद्यार्थ्यांचे सरसकट वर्ग ११ ऑगस्टपासून सुरू होतील, असेही ते म्हणाले.
अकरावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी
अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांनी प्रवेशही घेतले आहेत. या पार्श्वभूमीवर ज्या कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रवेश ५० टक्के झाले आहेत, त्या महाविद्यालयांना अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यास माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. पण, बहुतेक महाविद्यालये अद्याप सुरू झालेली नाहीत.
अकरावी प्रवेशाची सद्य:स्थिती –
एकूण विद्यार्थी २१ लाख,आतापर्यंत प्रवेश घेतलेले ५.१८ लाख,दुसरी गुणवत्ता यादी १७ जुलै,
महाविद्यालयांची सुरवात ११ ऑगस्टपासून

