१ लाखाचे १० लाख देण्याचे आमिष दाखवत लूटमारीचे रॅकेट, मुक्ताईनगर तालुका बनतोय आर्थिक लुटमारीचे केंद्र, पोलीस प्रशासनातील झारीचे शुक्राचार्याचे हात होताहेत ओले…!
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी- अक्षय काठोके :
मुक्ताईनगर तालुका आर्थिक लुटमारीचे केंद्र बनत चालला असून १ लाख रुपयांच्या बदल्यात १० लाख रुपयांची द्वितीय चलन नोट ( Second Currency ) देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्र तसेच मध्यप्रदेश व इतर राज्यातून आमिषाला बडी पडलेल्या लोकांना तालुक्यातील कुऱ्हा परिसरात बोलाऊन येथे लाखो रुपयांच्या लूटमारीचे रॅकेट जोमाने सुरु असून यात पोलीस प्रशासनातील काही झारीतील शुक्राचार्यांचे हात ओले होत असल्याची खमंग चर्चा संपूर्ण मुक्ताईनगर तालुक्या सह जिल्ह्यात होत आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा-काकोळा भागातील असलेल्या लालगोटा, चारठाणा, मधापुरी परिसरात काही लोकांकडून सोशल मीडियावर विविध व्हिडिओ टाकून १ लाखाच्या बदल्यात १० लाख द्वितीय करेन्सी (नोटा) देणार, तसेच नागमणी, काळी हळद असे व्हिडिओ खुलेआम सोशल मीडियावर अपलोड करण्यात येत आहेत. यामुळे आर्थिक आमिषा पोटी बडी ठरलेल्या महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील तसेच पर राज्यातील व्यक्तीना तालुक्यात बोलाऊन त्यांच्याकडून लुटमार होऊन त्यांना मारहाण करून सोडून दिले जात असल्याच्या घटना नेहमीच घडत आहेत.
दिवसाढवळ्या लूट मारी मागे या लुटेऱ्यांना अभय कोणाचे?
हे लुटेरे दिवसाढवळ्या कस्टमर व्यक्ती जर बसने आल्यास मलकापूर बस स्टैंड वर बोलवून त्यांची रिक्षा कस्टमर ला घ्यायला पाठवतात तसेच चार चाकी ने आल्यास लोकेशन टाकून कुऱ्हा भागात बोलवून त्यांना शेतात निर्जन स्थळी नेऊन अक्षरशः त्यांचे कपडे काढून आणलेले पैसे, मोबाईल, दाग दागिने लुटून, त्यांच्या मनात भीती निर्माण करून सोडून देण्यात येते. या सर्व रॅकेट मध्ये काही पोलीस कर्मचारी व राजकीय कार्यकर्ते सुद्धा सामील असल्याची मोठी चर्चा परिसरात सुरु आहे? या मुळे यांची हिम्मत दिवसेंदिवस वाढत असुन कुठलीच कारवाई न होता मोठी उलाढाल यात सुरू आहे.
पोलीस प्रशासनातील झारीचे शुक्राचार्याचे संगनमताने केला जातो लुटीचा डाव यशस्वी —
महाराष्ट्र व इतर राज्यातुन आर्थिक आमिषाला बळी पडलेल्या लोकांना बसने मुक्ताईनगरपर्यंत बोलावले जाते. आमिषाला बळी पडून येणाऱ्या या व्यक्तीची माहिती गाडी क्रमांक, नाव अशी इतंभूत माहिती हे लोक घेऊन या बाबत संबंधित पोलीस प्रशासनातील शुक्राचार्याना माहिती दिली जाते. संबंधित बस मुक्ताईनगर बस स्थानकावर दाखल होता बरोबर सदरील सिव्हिल कपड्यांमध्ये असलेले पोलीस दादांकडून आपण सामान्य नागरिक असल्याचे भासवून त्या व्यक्तींना हेरतात. नंतर त्यांचे मोबाईल चेक करून तुम्ही ” या” कारणासाठी या भागात आले आहेत ना? असे अनेक प्रश्न करून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतात व त्यांना भीती दाखवून सोडून देण्यात येते. यात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी भीतीने घाबरलेली व्यक्ती जात नाही आणि सदरील व्यक्ती गेलीच तर त्याला उलट तुम्ही का आला इकडे, असे एक ना अनेक प्रश्न केल्याने आधीच भीतीने घाबरलेल्या काही जण तक्रार दाखल करतात तर बरीच तक्रार दाखल न करताच निघून जातात. अशी मोठी चर्चा परिसरात होत असून यात काही पोलीसांच्या संगनमताने हे सर्व कट यशस्वी केले जात असल्याची चर्चा संपूर्ण परिसरात रंगत असल्याचे तालुक्यांसह परिसरात बोलले जात आहे.
पोलीस अधीक्षकांनी नेमलेले विशेष पथक गेले कुठे?
काही दिवसांआधी वार्षिक तपासणी निमित्त जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे आले असता त्यांनी या फसवणुकीवर कारवाई करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक व मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे ५ कर्मचारी व स्थानिक गुन्हे शाखेचे ५ कर्मचाऱ्यांचे विशेष पथकाची नेमणूक केली असल्याचे सांगितले होते. परंतु सदरील पथकाने कुठल्या कारवाया केल्या हाही एक संशोधनाचा विषय असल्याचे संपूर्ण मुक्ताईनगर तालुक्यांसह परिसरात बोलले जात आहे. त्यामुळे यात फसवणुकीच्या या रॅकेट मध्ये पोलिस प्रशासनातील ते सिव्हिल कपड्यांमध्ये सामान्य नागरिक असल्याचे भासवून लूट करणारे कोण हे शोधण्याचे मोठे आव्हानच वरिष्ठ पोलीस प्रशासनासमोर उभे असून यात वरिष्ठ पातळीवरून लक्ष घालून मोठ्या उपाय योजना करण्याची व सामान्य नागरिकांची होणारी लूट रोखण्याची गरज असल्याचे मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
मंडे टू मंडे न्यूज तर्फे नागरिकांना आवाहन-
“मंडे तू मंडे न्यूज ” तर्फे महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेरील नागरिकांना असे आवाहन करण्यात येत आहे की आपण १ लाखाला १० लाख च्या कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना बळी पडून या भागात या निमित्त येऊ नये.

