अखेर झोपलेले प्रशासन झाले जागे; नशिराबाद येथील जीर्ण जिल्हा परिषद शाळेची इमारत पाडण्यास सुरुवात
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज.डॉ.दीपक लोखंडे || नशिराबाद–सुनसगाव–बोदवड मार्गावरील खंडेराव मंदिरासमोरील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेची धोकादायक व जीर्ण झालेली इमारत तातडीने पाडण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होती. अखेर प्रशासनाने दखल घेत संबंधित इमारत पाडण्याच्या कामास सुरुवात केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शाळेची इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत होती. संबंधित इमारतीबाबत अनेक वेळा प्रस्ताव व अहवाल संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले होते. तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांनी दोन वेळा गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे इमारत पाडण्याचा प्रस्ताव सादर करून पाठपुरावाही केला होता. मात्र, दीर्घकाळ कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या ठराव क्र. ६९० नुसार शिक्षण व क्रीडा समितीच्या शिफारशीवरून नशिराबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेच्या तीन जीर्ण वर्गखोल्या पाडण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली होती. तरीही प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने संबंधित इमारत धोकादायक अवस्थेत उभी होती.
विशेष म्हणजे, शाळेच्या परिसरात दर शुक्रवारी आठवडे बाजार भरत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते. अनेक विक्रेते इमारतीलगत व्यवसाय करतात. याशिवाय परिसरात विद्यार्थ्यांची सतत वर्दळ असते. शेजारीच नशिराबाद–बोदवड हा मुख्य रहदारीचा मार्ग असल्याने संभाव्य दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात होती.
सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर इमारतीचा धोका आणखी वाढला होता. या संदर्भात नागरिक, व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी सातत्याने आवाज उठविल्यानंतर अखेर प्रशासनाने हालचाल करत जीर्ण इमारत पाडण्याच्या कामास सुरुवात केली आहे. धोकादायक इमारत हटविण्याच्या निर्णयामुळे संभाव्य दुर्घटना टळणार असून परिसरातील नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उर्वरित प्रक्रिया देखील वेगाने पूर्ण करून परिसर सुरक्षित करण्यात यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


