भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

नऊ ऑगस्ट, जागतिक आदिवासी दिनासाठी गावोगावी जनजागृती; लोहारा येथील फिरोज तडवी यांचा अनोखा उपक्रम

पारंपरिक पेहराव आणि झेंड्यांनी सजलेल्या दुचाकीने वेधले नागरिकांचे लक्ष

फैजपूर.मंडे टु मंडे न्युज || जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी लोहारा येथील सामाजिक कार्यकर्ते फिरोज तडवी यांनी हाती घेतलेला प्रचार-प्रसाराचा अनोखा उपक्रम परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून ते सातत्याने गावोगावी फिरून ९ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवत आहेत.

आदिवासी समाजाने आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा, मोठ्या संख्येने जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे आणि समाजात ऐक्याचा संदेश पोहोचावा, या उद्देशाने फिरोज तडवी विविध गावांमध्ये भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधत जनजागृती करत आहेत. यावेळी त्यांनी फैजपूर येथील पत्रकार राजू तडवी यांची भेट घेत जागतिक आदिवासी दिनाचा व्यापक प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रसारमाध्यमांनीही सहकार्य करावे, असे आवाहन केले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत या दिवसाचे महत्त्व पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


फिरोज तडवी यांच्या जनजागृती मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा पारंपरिक आदिवासी पेहराव आणि आदिवासी समाजाचा झेंडा तसेच राष्ट्रध्वज तिरंग्याने सजविलेली दुचाकी. त्यामुळे ते ज्या गावात पोहोचतात, तेथे नागरिकांचे लक्ष आपोआप त्यांच्याकडे वेधले जाते. लहान मुले, युवक आणि ज्येष्ठ नागरिक त्यांच्याशी संवाद साधून जागतिक आदिवासी दिनाबाबत माहिती जाणून घेत आहेत.

दरवर्षी जागतिक आदिवासी दिनानिमित्त रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक नृत्य तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांमध्ये अधिकाधिक नागरिकांचा सहभाग वाढावा, आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि हक्कांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी फिरोज तडवी सातत्याने प्रयत्न करत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या त्यांच्या या निस्वार्थ सामाजिक कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत असून अनेक युवक त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत आहेत. जागतिक आदिवासी दिन हा आदिवासी समाजाच्या अस्मिता, संस्कृती, परंपरा आणि योगदानाचा गौरव करणारा दिवस असल्याचा संदेश घराघरांत पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न यंदाही उत्साहाने सुरू असून, यावर्षीचा जागतिक आदिवासी दिन अधिक मोठ्या सहभागाने आणि जल्लोषात साजरा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!