OBC मध्ये आणखी नव्या २९ जातींचा होणार समावेश? केंद्राकडे पाठविणार राज्य सरकार प्रस्ताव
पुणे, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | OBC (इतर मागासवर्ग ) जातींच्या महाराष्ट्राच्या यादीत आता नव्या २९ जातींचा समावेश करण्यात येणार असून त्या बाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला शिफारशींचा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविला आहे. राज्यात ओबीसी जातींच्या यादीत सुमारे ३५१ प्रकारच्या मूळ जाती असून त्यात अनेक उपजाती आहेत. त्यात आणखी नव्या २९ जातींची भर पडणार आहे. त्या मुळे OBC मध्ये आता ३८० जाती असणार आहे.
राज्यात सध्या ओबीसी वर्गांमध्ये माळी, कुणबी, धनगर, वंजारी, तेली; तसेच विमुक्त जाती तसेच भटक्या जमाती यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील इतर मागासवर्ग समाजातील अनेक वर्गांकडून त्यांच्या जातीचा राज्याच्या ओबीसी जातींच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव देण्यात येतात. त्यानुसार मागासवर्ग आयोगाकडून संबंधित जाती समूहांबाबतचे पुरावे तसेच कागदपत्रांची छाननी केली जाते. कागदपत्रांची पडताळणी करून खातरजमा झाल्यानंतर संबंधित जातीचा राज्याच्या ओबीसी वर्गाच्या यादीत समावेश करण्यासाठी मागासवर्ग आयोगाकडून ओबीसींमध्ये नव्याने २९ जातींचा समावेश करण्याची सरकारला शिफारस करण्यात आली आहे. ओबीसीच्या जातींची यादी तयार करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. या संदर्भात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे आहेत.
राज्य सरकारला राज्य मागासवर्ग आयोगाने ज्या २९ जातींचा ओबीसी वर्गाच्या जातींच्या यादीत समावेश करण्यासाठी शिफारस केली आहे. त्यामध्ये लोध, लोधा, लोधी, बडगुजर, पेंढारी, वीरशैव लिंगायत, लिंगायत गुरव; तसेच लिंगायतमधील जंगम, न्हावी, तेली, माळी, धोबी, फुलारी, सुतारी आदी उपजातींच्या समावेशाची शिफारस केली आहे. पोवार, भोयर, पवार, गुजर, रेवा गुजर, सूर्यवंशी गुजर, बेलदार, सलमानी, किराड, डांगरी, कलवार, कुलवंत वाणी, वाणी (कुलवंत), कुमावत, नेवेवाणी, वरठी, परीट, धोबी, पटवा, सपलिग, सपलिगा, निषाद, मल्लाह, कुंजडा, दोरी, ईस्ट इंडियन, ईस्ट इंडियन ख्रिश्चन, शेगर, कानोडी, गवलान या जातींचा समावेश करण्याची शिफारस मागासवर्ग आयोगाकडून करण्यात आली आहे

